
राज्यात पावसाने जोर धरला असताना आज 5 ऑगस्ट रोजी पाऊस धुमशान घालणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामध्ये कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार होणार असून सात जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ही देण्यात आला आहे. मुंबईत मात्र पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचेही हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पाऊस होणार असून रायगडसाठी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पुण्यासह सातारा, कोल्हापुरातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याने या ठिकाणीही ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्येही मेघगर्जनेसह प्रतितास 30 ते 40 वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या विभागांतील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाला आहे.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, वर्धा, वाशीम, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जूनची कसर जुलैने भरून काढली
- जून महिन्यातील पावसाची कसर जुलै महिन्यात भरून निघाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 26 टक्के जास्त पाऊस झाला आहे. संपूर्ण जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत 136 टक्के पाऊस झाला आहे.
- या वर्षी मान्सूनवर ‘एल निनो’चे संकट होते. दोन महिन्यांत राज्यातील पावसाची सरासरी 544.5 मिमी आहे. मात्र प्रत्यक्षात 594.5 मिमी पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा 9 टक्के अधिक पाऊस राज्यात पडला आहे.
जूनमध्ये केवळ अर्धा पाऊस
राज्याची जून महिन्याची पावसाची सरासरी 209 मिमी आहे. मात्र प्रत्यक्षात जूनमध्ये केवळ 105 मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच सरासरी 50 टक्केच पाऊस झाला आहे. तर जुलै महिन्यात 385 मिमी पाऊस पडला आहे.

































































