
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उकाडय़ात मोठी वाढ झाली असून दररोज अनेक भागांमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. अशा विचित्र वातावरणामुळे पिकांबरोबर नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. मात्र उद्यापासून चार दिवस तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअस घट होणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांत सकाळी आणि दुपारी तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून राज्यभर सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे राज्यभरात उष्माघातासारख्या घटना घडल्या आहेत तर रात्री आणि सकाळी राज्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर पीक वाया गेले आहे. मात्र पुढील चार दिवस तापमान कमी होणार असल्यामुळे नागरिकांना उकाडय़ापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.
कोकण, गोवा, विदर्भात उष्णतेच्या लाटा
तापमानात घट होणार असली तरी कोकण, गोव्यातील काही ठिकाणी उष्णतेचा लाटा येतील. विदर्भात काही ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱयासह छोटय़ा सरी तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्याचबरोबर मध्य प्रदेश, चंदिगडमध्येही गारपीट होईल, असा इशारा डॉ. होसाळीकर यांनी दिला आहे.
मुंबईकरांनो, काळजी घ्या! हवामान विभाग, मुंबई महापालिकेचे आवाहन
राज्यात 40 अंशांपेक्षा जास्त तापमान गेल्यावर नागरिकांनी काळजी घ्यावी. मुंबई आणि ठाण्यातही पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत गरज नसल्यास शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई हवामान विभागाने केले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने मुंबईकरांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी, शक्यतो दुपारी बाहेर पडू नये, पडल्यास टोपी, छत्री घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे, अंगात सुती कपडे घालावेत, मुले आणि वृद्धांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.





























































