
बारावी सायन्स शाखेची परीक्षा दिलेल्या आणि मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या राज्यातील तब्बल 25 हजार विद्यार्थ्यांना एचसीएलने शिष्यवृत्ती आणि नोकरीची हमी दिली आहे. या विद्यार्थ्यांना एचसीएल या कंपनीच्या माध्यमातून आयटीचे प्रशिक्षण आणि शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. महाराष्ट्र यंग लीडर ऍस्पिरेशन डेव्हलपमेंट (एमवायएलएपी) या महत्त्वाकांशी प्रोग्रॅमद्वारे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून उद्या सोमवार, 6 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सदर प्रोग्रॅमचे उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्र यंग लीडर ऍस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी बारावी विज्ञान शाखेतून गणित विषय घेऊन सन 2021 मध्ये बारावी उत्तीर्ण झालेले आणि 60 टक्के गुण असलेले तसेच वर्ष 2022 मध्ये विज्ञान शाखेतून गणित विषय घेत बोर्डाची बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी सदर प्रोग्रॅममध्ये सहभाही होऊ शकतात. या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर नोंदणी करण्यात येणार असून ही नोंदणी 6 जूनपासून WWW.HCLTECHBEE.COM या वेबसाईटवर करता येईल, अशी माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली. पहिल्या सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर सहा महिने विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. यानंतर यशस्वीरित्या एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना याच कंपनीमध्ये आयटी प्रोफेशनल म्हणून पदवीचे शिक्षण आणि त्यानंतर लाखो रुपयांच्या पॅकेजसह 100 टक्के नोकरी आणि शिष्यवृत्तीही मिळणार असल्याची माहिती संगवे यांनी दिली.






























































