शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक

विधान परिषदेच्या नाशिक व नागपूरमधील शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील  निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय उद्या गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज माध्यमांना दिली.

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत, पक्षाचे नेते व खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

या बैठकीनंतर माहिती देताना अशोक चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे प्रमुख नेते आज मुंबईत नव्हते. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. या बैठकीत अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुरुवारी चर्चेला येतील. त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. दुपारपर्यंत महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय घोषित करण्यात येईल, असे अशोक चव्हाण म्हणाले.

तिन्ही पक्षात योग्य समन्वय

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे तसेच काँग्रेस पक्षातही कोणताच गोंधळ नाही. नाशिक मतदारसंघात भाजपाला उमेदवारही मिळाला नाही, दुसऱ्यांचे घर फोडणे हीच भाजपाची परंपरा आहे. महाविकास आघाडी म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढवत असून पाचही जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळेल, असा विश्वास या वेळी नाना पटोले यांनी व्यक्त केला.