दुष्काळ निवारणसाठी शेतकरी संघर्ष समितीचा रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। माजलगाव

सध्या शेतकरी दुष्काळाने त्रस्त असून साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा 265 जातीचा ऊस गाळपास न्यावा, यासह तालुक्यातील दुष्काळ निवारण त्वरित करण्यात यावे या मागण्यासाठी बुधवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरील परभणी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. गंगाभीषन थावरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान यावेळी जय महेश खाजगी साखर कारखान्याने एफआरपी प्रमाणे 2155 रुपये प्रतिटन दर उसाला देणार असल्याचे लेखी उत्तर देऊन 256 जातीचा ऊस तोडणी साठी नेण्यात येईल असे जाहीर केले.

तालुक्यातील दुष्काळ निवारणाची कामे त्वरित सुरु करण्यात यावेत, या मागणीसह दोन वर्षापूर्वी माजलगाव तालुक्यातील तीन साखर कारखान्यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी 265 जातीचे ऊस घेणार नसल्याचे जाहीर केले होते.पण त्यानंतर साखर आयुक्तांशी झालेल्या बैठकीनंतर कारखान्यांनी तसे आदेश दिले होते. त्यानंतर कारखान्यांनी हा ऊस उचलला पण पुन्हा कारखाने आडकाठी आणत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. आधीच दुष्काळ त्यातच हुमनी अळीने ऊसाचे वाळवण झाले. अनेक शेतकऱ्यांचा ऊस पाण्याअभावी जळुन जात आहे. म्हणून गेटकनचा ऊस आणू नये,सरसगट कर्ज माफी करावी,रोजगार हमीची कामे सुरू करावीत, यासह इतर मागण्यासाठी परभणी चौकात बुधवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषन थावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैलगाडी बारदाण्यासह एक तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार एन.जी.झम्पलवाड यांना देण्यात आले. दरम्यान यावेळी मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.