
धुलीवंदन म्हणजे आनंद, उत्सव आणि रंगाची उधळण. होळीला थंडाई पिण्याची पद्धत उत्तर हिंदुस्थानात आहे. साधारणत: होळीनंतर वातावरणात बदल होऊन तापमान वाढते. अशा उकाड्यात शरीरात थंडावा राहण्यासाठी थंडाई प्यायली जाते. त्यामुळे रंगाच्या या उत्सवात थंडाईला वेगळे महत्व असते. त्यामुळे घरच्या घरी ही थंडाई बनवायची असेल तर ही रेसिपी जाणून घ्या.
थंडाईसाठी लागणारे साहित्य –
50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम टरबुजाच्या बिया, 25 ग्रॅम खसखस, 25 ग्रॅम बडिशेप, अर्धा चमचा काळी मिरी, 250 ग्रॅम साखर, एक चमचा वेलची पावडर, 4 चमचे गुलाबपाणी, 8 ते 10 केशरच्या काड्या, अर्धा लीटर पाणी.
कृती –
बदाम, टरबुजाच्या बिया, खसखस, पिस्ता, बडिशेप आणि काळी मिरी ही सामग्री चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवा. पाच तास उलटल्यानंतर भिजलेली साहित्य एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. गॅसवर एका पातेल्यात पाणी आणि साखर एकत्र करा. पाच मिनिटानंतर मिक्सरमधील पेस्ट साखरेच्या पाण्यात टाका आणि मिश्रण सतत ढवळत राहा. काही वेळाने हे मिश्रण घट्ट होऊ लागेल. त्यानंतर यात गुलाबपाणी, वेलची पावडर आणि केसर टाकायचे. गॅस बंद करुन मिश्रण थंड होऊ द्या. हे मिश्रण एका बाटलीत भरुन ठेवा. आणि ज्यावेळेस थंडाई बनवायची असल्यास एक ग्लास दुधात चार चमचे हे थंडाईचे मिश्रण मिसळायचे आणि त्यात बर्फ टाकून सर्व्ह करा.
थंडाईचे फायदे
– अपचन होत असल्यास थंडाई प्यावी. थंडाईत काही लोक बडीशेपही टाकतात. त्यामुळे शरीराला थंडावा मिळून गॅसेस संबंधिच्या समस्या दूर होतात. बडीशेपमध्ये अॅण्टी इंफ्लेमेट्री गुणधर्म असल्याने पचनक्रिया सुधारते.
– थंडाई तयार करताना त्यात टरबूजाच्या बिया घातल्या जातात. त्यामुळे शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. त्याचबरोबर थंडाईत असलेल्या बदाम, पिस्ता यांसारख्या पदार्थांमुळेही शरीराला ताकद मिळते.
– थंडाईत काळीमिरी आणि लवंग असे मसाल्याचे पदार्थ असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. त्याचबरोबर थंडाईत असलेल्या अॅँटी डिप्रेशन आणि अॅंटी ऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे आरोग्यासाठी फायदेशीर ठऱते.
– बद्धकोष्ठतेचा त्रास होत असलेल्यांनी थंडाई आवर्जुन प्यावी. थंडाईत खसखस असल्यामुळे पोटातील आतड्यांची होणारी जळजळ कमी होते. थंडाईत प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि मि़नरल्स देखील असतात.




























































