मलेशियात मल्लखांबच्या थरारक कसरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mallakhamb competition in malaysia

क्रीडा प्रतिनिधी । मुंबई

येत्या फेब्रुवारीत मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्य़ा पहिल्या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांच्या यादीत आता मलेशियाची भर पडली आहे. विश्व मल्लखांब महासंघाचे महासचिव व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी नुकताच मलेशियाचा दौरा केला. त्यावेळी नित्यानंद आश्रम संघ, सेलेंगोर, येथे योग प्रशिक्षिका कॅरीन हाऊ यांच्या पुढाकाराने चीनमधून आलेल्या पण वर्षानुवर्षे मलेशियात स्थायिक झालेल्या 25 योगसाधकांना ‘सिंटा सयांग, सुंगाई पटाणी’ येथील ‘परफेक्ट लाइफ मॅनेजमेंट’चे संस्थापक डॉ. राजेंद्रन यांच्या 30 योग विद्यार्थ्यांना व कौलालंपूर येथील ‘अलोकाज् आर्टस् ऍकॅडमी’च्या संचालक विजया सुब्रमण्यम यांच्या 30 सभासदांना दोरी मल्लखांबाचे प्रशिक्षण दिले.

योगासनांची पार्श्वभूमी असल्याने या तीनही ठिकाणी प्रशिक्षणार्थींनी अल्पावधीतच चांगले प्रावीण्य प्राप्त केले. स्थानिक वर्तमानपत्रांतही त्याबद्दल छायाचित्रांसह कौतुकमिश्रित लेख छापून आले. मलेशियात तीन विभिन्न ठिकाणी मल्लखांब प्रशिक्षण झाल्याने एक चांगली वातावरणनिर्मिती झाली. मुंबईत होणाऱया पहिल्या मल्लखांब विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱया मल्लखांबपटूंची संख्या खूप वाढली, परंतु एका देशातून कमाल सहा पुरुष व सहा महिलाच त्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकत असल्याने आणखी एक कार्यशाळा घेऊन मलेशियाच्या संघाची निवड करावी अशी इच्छा तीनही आयोजकांनी व्यक्त केली. स्वतः कॅरीन हाऊ, इरिन बाँग, सामन्था गन, जेम्स पँग, हुई हुई, सी. ली. ही नावे मलेशियाच्या संघात असू शकतील.