मल्लखांबपटू हिमानी परबला शासकीय सेवेत थेट नियुक्ती, सुनील शिंदे यांच्या मागणीला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्जुन पुरस्कारप्राप्त मल्लखांबपटू हिमानी परब हिला राज्य शासनाच्या सेवेत थेट नियुक्ती देण्यात येईल, असे आश्वासन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात दिले. सुवर्ण पदक विजेत्या पात्र खेळाडूंना शासनाच्या सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत लवकरच धोरण बनवले जाईल, असेही ते म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी हिमानी परब हिला शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे सभागृहात केली होती. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023 वरील चर्चेवेळीही शिंदे यांनी या मुद्दय़ावर जोर दिला. हिमानी परबला शासकीय सेवेत विनाअट थेट नियुक्ती द्या, असा जोरदार आग्रह त्यांनी धरला. शिवसेना नेते आमदार ऍड. अनिल परब यांनीही खेळाडूंना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण असल्याचे क्रीडा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. सभापतींनीही महिला खेळाडूसंदर्भातील ही बाब सरकारने गांभीर्याने घेऊन किती दिवसांत यावर निर्णय घेणार याबाबत सदस्यांना आश्वस्त करावे असे सांगितले. त्यावर क्रीडामंत्री बनसोडे यांनी येत्या एक महिन्यात पात्रता तपासून संबंधित खेळाडूंच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सभागृहात दिले.