पाच वर्षांत मंडलिक बिंदू चौकात आलेले कोणी पाहिलेय का? मालोजीराजे छत्रपती यांचा सवाल

 ‘खासदार झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात राहू द्या, कोल्हापूरचे ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक बिंदू चौकात खासदार संजय मंडलिक आले होते, असे कोणी पाहिले आहे का?’ असा सवाल करीत, ‘अशा निक्रिय, अकार्यक्षम, गद्दार खासदाराला त्याची जागा दाखवून द्या,’ असे आवाहन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केले. या सभेमध्ये देण्यात आलेली ‘मान आणि मत गादीला आणि कायमचा रामराम मोदीला’ ही घोषणा लक्षवेधी ठरली.

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ बिंदू चौक परिसरात झालेल्या सभेत मालोजीराजे बोलत होते. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी नगरसेविका जैबुनिस्सा सय्यद, मौलाना अब्दुल सलाम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद डिगे, मुस्लिम बार्ंडगचे चेअरमन गणी आजरेकर आदी उपस्थित होते.

कोल्हापुरात महायुतीचे ढीगभर नेते आहेत; पण कोल्हापुरात विकास बघायलाही मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत मालोजीराजे म्हणाले, ‘केवळ पोकळ घोषणा आणि डिजिटलपुरता विकास कोल्हापूरच्या जनतेच्या नशिबी आला आहे. लोकतंत्र आणि लोकशाहीचा खून करू पाहणाऱया भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना आता घरी बसविले पाहिजे. राजकीय दहशतवाद गाडून टाकण्यासाठी शाहू महाराज यांच्या पाठीशी राहा,’ असे आवाहन मालोजीराजे यांनी केले.

‘राधानगरी धरणाच्या माध्यमातून जिल्हा सुजलाम्-सुफलाम् करणाऱया राजर्षी शाहू महाराजांचे ऋण फेडण्याची संधी चालून आली आहे. शाहू छत्रपतींना निवडून देऊन या संधीचे सोने करूया,’ असे आवाहन माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी केले.