
सर्वच ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोरोना नियंत्रणासाठी गाव स्तरावर ग्राम व वार्ड समिती पुन्हा सक्रिय करण्यात आली आहे. समितीवर लक्ष ठेवण्यासाठी संपर्क व सहसंपर्क अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व मुख्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आदेशपत्रही देण्यात आले आहेत. अशी माहिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्याबाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तींसाठी कोरोना टेस्ट बंधनकारक असणार आहे. विहित मुदतीतील कोरोना टेस्ट निगेटिव्ह सर्टिफिकेट सोबत असावे अथवा गावात आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. कोरोना लसीकरण दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना आरोग्य अधिकारी यांच्या सल्ल्याने यातून सवलत असणार आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने देण्यात आली.
मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी दालन येथून तालुक्यातील 65 ग्रामपंचायत सरपंच यांची ऑनलाईन बैठक मंगळवारी सकाळी पार पडली. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, आरोग्य विस्तार अधिकारी सुरज बांगर आदी उपस्थित होते.
गावात 45 वर्ष वरील व्यक्तींचे लसीकरण लस उपलब्धतेनुसर पूर्ण करून घेणे. आगामी काळात लसीकरण होणाऱ्या 18 वर्ष वरील व्यक्तींची यादी तयार करणे. गावात औषध फवारणी व अन्य कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबवणे. संपर्क व सहसंपर्क अधिकारी यांनी गावात भेटी देऊन दर दिवशी कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे. असे आदेश, सूचना बैठकीत देण्यात आल्या.
बैठकीत सरपंच यांनीही अनेक सूचना मांडल्या. त्यावरही उपाययोजना सुचवण्यात आल्या. बैठकीत सरपंचांचा सक्रिय सहभाग राहिला. अशी माहिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी दिली



























































