मालवणात कॉलेज युवतीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिम खोत । मालवण

मालवण शहरातील धुरीवाडा कन्याशाळे नजीक एका कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या संजना उर्फ सोनाली संजय पेंडुरकर (वय १९) या कॉलेज तरुणीने सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

मालवण धुरीवाडा येथे संजय पेंडुरकर हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. पेंडुरकर हे नेहमीप्रमाणे आपल्या सुवर्ण पेढीवर गेले होते. तर त्यांची पत्नी आणि कु संजना ही घरातच होती. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सौ. पेंडुरकर या दुकानावर गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास घरात कोणी नाही हे पाहून संजना हिने पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली.

संजना ही रत्नागिरी येथील तंत्रनिकेतनमध्ये इलेक्ट्रॉनिक शाखेत शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होती. सुट्टीचा कालावधी असल्याने ती मालवणला घरी आली होती. एक हसतमुख व्यक्तिमत्व नवोदित गायिका म्हणून तिने जिल्हाभरात नावलौकिक प्राप्त केला होता.

संजना हिच्या आकस्मिक मृत्यूची माहिती मिळताच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, उमेश नेरुरकर, नगरसेवक यतीन खोत, दिपक पाटकर, दिपा शिंदे, सुनीता जाधव, पुजा करलकर, ममता वराडकर, संजय गावडे महेश गिरकर यांनी धाव घेतली. संजना हिच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी असा परिवार आहे.