
अमित खोत । मालवण
नरभक्षक बनली म्हणून ज्या ‘अवनी’ वाघिणीला प्रशासन गोळ्या घालून ठार मारते. त्याच महाराष्ट्रात वाघांना देवता मानून त्यांची पूजा करण्याची प्रथा आजही मोठ्या उत्साहात जोपासली जात आहे. सिंधुदुर्गातील शेतकरी भात कापणीच्या सुरुवातीला निसर्गाबरोबर वाघाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा करतात. सिंधुदुर्गच्या मातीत ही प्रथा ‘गवळदेव’ स्नेहभोजन म्हणून प्रसिद्ध आहे.
कोकणात भात कापणी झाली की शेतकरी, गुराख्यानां वेध लागतात ते ‘गवळदेव’चे. गावाचा सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणारा व पर्यावरण पूरक जीवनाचे शिक्षण देणारे हे आगळेवेगळे स्नेहभोजनच म्हणावे लागेल.
भगवान श्री कृष्णाने ही परंपरा सुरू केल्याचे सांगितले जाते. आज घरोघरी गुरांची संख्या फार कमी होत असली तरी मालवणसह सिंधुदुर्गात ही ‘गवळदेव’ परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जात आहे.
वाडी- वस्ती लगत जंगलात, डोंगराळ भागात पाणवठयाच्या ठिकाणी हा उत्सव प्रामुख्याने होतो. सर्व गुराखी, शेतकरी,लहान थोर मंडळी गवळदेवाच्या स्थानची साफ़सफाई करतात. तुळशी वृंदावनाची डागडुजी केली जाते. तेथील देव देवतांची पूजा अर्चा केली जाते. मातीचा वाघोबा तयार केला जातो व त्याची पूजा केली जाते. नंतर डाळ, भात,भाजी, खीर असे जेवण तयार करून तेथील देवदेवता, गवळदेव, वाघोबा, यांना नेवैद्य दाखविला जातो. नंतर सर्व गुराखी, शेतकरी, लहान मुले एकत्र केळीच्या पानावर जेवण घेऊन एकत्र बसून सामूहिक वनभोजनाचा आस्वाद घेतात व आनंद लुटतात.

वाघाला साकडे घातले जाते
निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ असल्याचे भारतीय संस्कृती सांगते. म्हणूनच कुठलेही काम, व्यवसाय निसर्गपूरक असावा अशी शिकवण भारतीय संस्कृती देते. भारतातील सर्व उत्सव प्रथा-परंपरा हे पर्यावरण स्नेही आहेत. पाण्यात राहून माशाशी वैर करणे उचित नव्हे तसेच जंगलात वावरायचं, तर जंगली प्राण्यांशी वैर पत्करून कसं चालेल…? जंगलात चरणारी गाई- गुरे व गुराख्याचे जंगली पशूं पासून संरक्षण व्हावे, यासाठी निसर्ग देवतेला व जंगलाच्या वाघाला साकडं घालण्याचा गवळदेव हा कार्यक्रम. आम्ही तुझ्या जंगल भागात येत नाही. तू ही आमच्या पाळीव जनावरांचे संरक्षण कर त्यांच्यावर हल्ला करू नको. असे साकडे जणू वाघाला या निमित्ताने घातले जाते.

प्रतिकात्मक वाघाला पळवून लावतात
सगळ्या गुराढोरांचे रोगराई व हिंस्त्र प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी व धनधान्य, दुग्धजन्यउत्पादनाच्या बरकती साठी देवाकडे साकडे घातले जाते तेथील देवतेचा कैल घेतला जातो. प्रतिकात्मक वाघाची पिटाई (पळवून लावत) करून या कार्येक्रमाची सांगता होते. निसर्गासोबत सहभोजन घेण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा वसा आणि वाघाला देव मानण्याची परंपरा हे गावचे गावपण टिकवून ठेवण्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य होय.




























































