
सामना प्रतिनिधी । मुंबई
लेखक वसंत सबनीस यांनी लिहिलेले ‘मामला चोरीचा’ हे विनोदी नाटक तब्बल ३२ वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगमंचाकर नव्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्री साई प्रोडक्शन व स्पंदन निर्मीत केलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन मंगलदास माने यांनी केले आहे. येत्या रविवारी २४ जून रोजी सातारा रोडवरील आण्णाभाऊ साठे नाटय़गृहात हा प्रयोग रंगणार आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग ६ मे १९८५ रोजी पुण्याच्या बालगंधर्व सभागृहात झाला होता. दामू केंकरे दिग्दर्शित या नाटकामध्ये शरद तळकळकर, आश्विनी देसाई यांनी भूमिका साकारल्या होत्या. यावेळी आदर्श गायकवाड, सागर पवार, संजय देवळे, केतकी लांडे, ऐश्वर्या कुलकर्णी, संजय चव्हाण आणि विद्या भागवत हे कलाकार असणार आहेत. दिग्दर्शक मंगलदास माने म्हणाले, पिढय़ानपिढय़ा बदलल्या तरी कुटुंबातील आई ही आईच असते. आजच्या पिढीमध्ये आईची भूमिका बदलत चालली आहे. आईने आपल्या मुलांना किती सवलत द्यावी की धाकात ठेवावे हा विचार समाज करीत आहे. अशातच वसंत सबनीस यांचे ‘मामला चोरीचा’ नव्या रुपात सादर करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी मृणाल माने व सीमा गायकवाड या निर्मात्या म्हणून लाभल्या. मोहन कुलकर्णी यांनी व्यवस्थापन उत्तम पाहिले.



























































