
गरीबांना वर्षाला 6 हजार रुपये, दरवर्षी रोजगाराच्या 5 लाख संधी आणि पश्चिम बंगालला देशातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचा निर्धार करणारा जाहीरनामा तृणमूल र्कांग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज जाहीर केला. हा जाहीरनामा ‘माँ, माटी आणि मानुष’साठी असल्याचे त्यांनी सांगितले.
तृणमूल सरकारच्या काळात बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आणि लोकांचे उत्पन्न वाढल्याचे त्यांनी जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्यात त्यांनी काही घोषणाही केल्या आहेत. राज्यातील दीड कोटी कुटुंबातील महिला प्रमुखाला 500 रुपये तर अनुसूचित जाती-जमातीतील परिवाराला महिना 1 हजार रुपये देणार, विद्यार्थ्यांना 4 टक्के व्याजदराने दहा लाख रुपये मर्यादेचे क्रेडिट कार्ड देणार, 68 लाख लहान शेतकऱयांना एक एकर जमिनीसाठी दहा हजारांची मदत, येत्या 5 वर्षांत 10 लाख लहान आणि 2 हजार मोठय़ा औद्योगिक कंपन्यांची स्थापना करणार, सर्व 23 जिल्हा मुख्यालयांमध्ये मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय स्थापन करणार, गावा-गावात 25 लाख घरे तयार करणार, सर्व घरांमध्ये सात दिवसांत 24 तास वीजपुरवठा करणार आणि 47 लाख कुटुंबांना पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करणार अशा घोषणांचा जाहीरनाम्यात समावेश आहे.
शरद पवार प्रचाराला जाणार
तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाणार आहेत. पवार 1 ते 3 एप्रिलपर्यंत पश्चिम बंगाल दौऱयावर जातील. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आमदार सुप्रिया सुळेही असतील असे सांगण्यात आले.

























































