चटक मटक धम्माका, सापाला मारले; मीठ मसाला लावून खाल्ले

डोंगराळ, दुर्गम किंवा जंगली भागात राहणाऱ्यांना बिकट परिस्थितीत तग धरण्यासाठी काहीवेळा वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खावे लागते. अशा प्रकरच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, नागरी भागात अशी बिकट परिस्थिती सहसा येत नाही. मात्र, फक्त हौसेसाठी किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काही लोकांकडून वन्य प्राण्यांची शिकार करण्यात येते. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईदेखील होते. तामिळनाडूमध्ये अशीच एक घटना घडली आहे. चारजणांनी एका सापाला पकडले. त्याचे तुकडे केले. त्याचे मांस शिजवून मसाला लावून खाल्ले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर इतर तिघांचा शोध सुरू आहे.

तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यात थंगमपुरिपट्टीनम या गावात सुरेश राहतो. त्याने आणि त्याच्या तीन मित्रांनी जंगलातून एका सापाला पकडले. त्याला मारून त्याचे तुकडे केले. त्यानंतर ते शिजवले आणि मसाला लावून खाल्ले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चारजण असून सापाचे तुकडे करून ते शिजवताना आणि मसाला लावून खाताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वन विभाग आणि पोलिसांनी घटनेची दखल घेतली आहे. मेट्टूर क्षेत्रातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरेशला अटक केली आहे. तसेच व्हिडीओत दिसणाऱ्या आणखी एकाची ओळख पटली असून हुसैन असे त्याचे नाव आहे. इतर दोघांबाबतची माहिती मिळवण्यात येत आहे.

सुरेशला न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून या घटनेत सहभागी असलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. घटनेतील सुरेश आणि हुसैन यांची ओळख पटली आहे. सुरेशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे. तर हुसैनचा शोध घेण्यात येत आहे. तसेच इतर दोघांची माहिती घेण्यात येत आहे. घटनेची चौकशी करून इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या