
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश दिपांकर दत्ता यांच्या नावाने उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारला फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मैकुलाल चंदन दिवाकर असे त्या तरुणाचे नाव असून तो मूळचे उत्तर प्रदेशमधील बरेलीचा रहिवासी आहे.
मैकुलालने मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार दिलीप कुमार कुलकर्णी यांना एकदा फोन केला होता. त्यावरून त्याने तो सरन्यायधीश दिपांकर दत्ता बोलत असल्याचे सांगितलेले. त्यानंबरच्या व्हॉट्सअॅपवरही दिपांकर दत्ता यांचा फोटो व नाव होते. त्यामुळे कुलकर्णी यांची खात्री पटली की हा नंबर त्यांचाच होता. त्यामुळे त्यांनी तो नंबर मुख्य न्यायधीशांच्या नावाने सेव्ह केला.
25 जून रोजी कुलकर्णी यांना त्या नंबर वरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने त्यांची चौकशी केली व नंतर मी एका महत्त्वाच्या मिटिंगमध्ये अडकलो आहे त्यामुळे तुम्ही माझे एक काम कराल का? अशी विचारणा केली. त्यावरून कुलकर्णी यांनी देखील होकार दिला. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने तुम्हाला अॅमेझॉन गिफ्ट पे कार्ड विषयी माहित आहे का असे विचारले. त्यावरून कुलकर्णी यांना संशय आला. त्यांनी तत्काळ मुख्य न्यायधीशांच्या कार्यालयात फोन केला व याबाबत विचारले. तेव्हा त्यांना कळाले की मुख्य न्यायधीशांनी किंवा त्यांच्या कार्यालयातून कोणताही फोन केलेला नाही. त्यानंतर कुलकर्णी यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी मैकुलालला अटक केली. त्याच्या विरोधात आधीच नागपूर व संभाजीनगर येथे तक्रारी दाखल असल्याचे देखील समोर आले आहे.




























































