
सामना ऑनलाईन । महाबळेश्वर
मोबाईलवर बोलत असताना किंवा फोटो काढत असताना सभोवतालचे भान विसरल्याने झालेले अपघात, सेल्फीच्या क्रेझपायी गेलेला जीव या घटना यापूर्वी अनेकदा झाल्या आहेत. या अपघातानंतरही सर्वांना अजून शहाणपण आलेले नाही. ताजी घटना महाबळेश्वर येथे घडली असून सेल्फी काढताना विनोद जाधव हा पर्यटक दरीत कोसळला. 200 फुटांवर झाडीत अडकलेल्या जाधव यांना बाहेर काढण्यात आले परंतु गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
थंडीचा मोसम सुरू असल्याने महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. याच दरम्यान पर्य़टनासाठी आलेला विनोद जाधव हा पर्य़टक लॉडविक पाईंटवर सेल्फी घेत असताना दरीत कोसळला. यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले व बचाव कार्याला सुरुवात केली. बचाव पथकाला जाधव 200 फुटांवर अडकल्याचे दिसले.
जाधव यांची हालचाल दिसल्याने ट्रेकर्सने वेगाने खाली उतरत त्यांना बाहेर काढले. जाधव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
विनोद जाधव हे शहापूर ठाणे येथील रहिवाशी असून ते कुटुंबासोबत महाबळेश्वर येथे फिरायला आले होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली.

































































