
सामना प्रतिनिधी । मालवण
समुद्री लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या युवक, युवतीस पोलिस कर्मचारी सिद्धेश चिपकर यांनी वाचविल्याची घटना मालवण रॉकगार्डननजीक घडली. युवती व युवती हे दोघेजण बांदा येथून मालवण येथे पर्यटनासाठी आले होते अशी माहिती समोर आली आहे.
रॉकगार्डन परिसरातील खडकाळ भागात समुद्री लाटांचा आस्वाद घेत असताना अचानक लाटांचा जोर वाढला. लाटांच्या तडाख्यात दोन पर्यटक अडकल्याची माहिती स्थानिक मच्छीमाराने पोलिसांना दिली. त्यानंतर तत्काळ हवालदार सुभाष शिवगण व पोलिस कर्मचारी सिद्धेश चिपकर, महिला पोलिस कर्मचारी प्रतिभा जाधव, प्रविणा आचरेकर यांनी रॉकगार्डनच्या खडकाळ भागात धाव घेतली. युवती व युवक खडकात लाटांनी वेढलेल्या स्थितीत अडकून पडल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी चिपकर यांनी जोरदार लाटांचा मारा कायम असताना युवक-युवतीस सुरक्षित बाहेर काढले. दोघांना जीवदान देत देवदूत बनलेल्या सिद्धेश चिपकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

































































