
मेडिकल शॉपचा वास्तुशास्त्र सल्ला घेण्याच्या बहाण्याने मित्रानेच वास्तुशास्त्र सल्लागार मित्राचे अपहरण केल्याची घटना 16 ऑक्टोबरला बिबवेवाडीत घडली आहे. अपहरण झालेले वास्तुशास्त्र सल्लागार अंगावर मोठ्या प्रमाणात दागिने असल्याने त्यांचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे.
नीलेश वरघडे (वय 43, रा. बिबवेवाडी) असे अपहरण झालेल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. याप्रकरणी दीपक नऱ्हळे (रा. नऱ्हे आंबेगाव) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपाली रूपेश वरघडे यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी रूपाली यांचे दीर नीलेश वास्तुशास्त्र सल्लागार आहेत. 16 ऑक्टोबरला नीलेशचे मित्र दीपकने त्यांना नऱ्हेतील मेडीकल शॉप वास्तुचा सल्ला घेण्यासाठी बोलावले. तेव्हापासून 24 ऑक्टोबरपर्यंत घरी पोहोचले नाहीत. नीलेश यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात दागिने असल्यामुळे त्यांचे अपहरण दीपकने केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे तपास करीत आहेत.



























































