भायखळ्यात पार्किंगच्या वादातून तरुणाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भायखळा येथे पालिकेच्या पे ऍण्ड पार्किंगमध्ये काम करणाऱ्या तरुणाची पार्किंगच्या वादातून हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश नटवर कोये (३०) असे मृत तरुणाचे नाव होते. एस. पाटनवाला मार्गावरील इमारत क्रमांक ३च्या समोर पालिकेचे पे ऍण्ड पार्किंग आहे. तेथे भावेश कामाला होता. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पार्ंकगवरून तीन अज्ञात इसमांची भावेशसोबत बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान वादात होऊन मग त्या तिघांनी भावेशच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केले. तसेच प्रतीक पडवळ (२६) आणि राजेश यांना हाताने, पट्टय़ाने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. भायखळा पोलिसांनी शमशाद उमर शेख (१९) या आरोपीला अटक केली असून बाकीचे फरार आहेत.

खारच्या समुद्रकिनाऱ्यावरील तिवरांच्या झुडुपात मृतदेह सापडला

खार पश्चिमेकडील कार्टर रोड येथे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या तिवरांच्या झुडुपात एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तिशीतल्या तरुणाचा तो मृतदेह असून त्याच्या गळ्यावर वार केलेला आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

कार्टर रोड येथे लोकांचा सदैव राबता असतो. तेथे असलेल्या समुद्रकिनारी मोठय़ा प्रमाणात तिवरांची झाडे आहेत. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या झाडीत अज्ञात तरुण जखमी अवस्थेत लोकांना दिसला. याची माहिती मिळताच खार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणाला भाभा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्या अज्ञात तरुणाला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या तरुणाच्या गळ्यावर तसेच डोळ्याच्या वरच्या बाजूला जमखा आहेत. तिवराच्या झाडांमध्ये मृतदेह सापडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून या तरुणाचा मृतदेह तेथे कोणी आणून टाकला, तसेच त्या तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.