
जेवायला न दिल्यामुळे पत्नीला बेदम मारहाण करीत रिक्षाचालकाने तिचा खून केला आहे. ही घटना 30 जानेवारीला रात्री दोनच्या सुमारास बिबवेवाडीतील इंदिरानगरमध्ये घडली.
सविता संदीप औचिते (वय 32, रा. बिबवेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी परशुराम उदडंप्पा जोगन (वय 38 रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. गणेश शिंदे (वय 33) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परशुराम रिक्षाचालक असून सविता ही त्याची दुसरी पत्नी होती. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी होत होती. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास परशुराम घरी आला असता, सविताने त्याला जेवायला दिले नाही. त्याचा राग आल्यामुळे त्याने सविताला बेदम मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.





























































