मानखुर्दमध्ये शाहरुख खानचा तरुणावर प्राणघातक हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाहरुख ऊर्फ चिरा खान (24) याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मानखुर्द येथे घडली. चाकूने पोटात व पाठीत भोसकल्यानंतर शाहरुखने परिसरातील नागरिकांना चाकूचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मानखुर्द पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

खारघर येथे राहणारा चिन्नाद्वारे पिल्ले (27) हा त्याच्या चार मित्रांसह पोंगल सणानिमित्त एकत्र येऊन मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंड येथील इमारत क्रमांक 51 व 52च्या मध्ये गप्पा मारत असताना शाहरुख तेथे आला व माझ्या भावाला कोणी मारले, अशी विचारणा करू लागला. तेव्हा तू आम्हाला का विचारतोस, असे सतीश कुमार याने विचारले.

यामुळे शाहरुखची सटकली आणि त्याने सोबत आणलेल्या चाकूने सतीशच्या पोटात आणि पाठीवर वार केले. तसेच अन्य तिघांना चाकूचा धाक दाखवत घाबरवले. इतकेच न करता त्याने परिसरातील नागरिकांनादेखील धमकावत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून शाहरुख खान याला अटक केली.