रिलायन्स हॉस्पिटल आणि ‘अॅण्टेलिया’ उडविण्याची धमकी, बिहारमधून धमकावणाऱ्या कॉलरला उचलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये बुधवारी दोनवेळा निनावी फोन करून हॉस्पिटल आणि अंबानी यांचे ‘अॅण्टेलिया’ हे आलिशान घर उडवून देण्याची धमकी देणारा कॉलर अखेर पोलिसांच्या ताब्यात आला. राकेश मिश्रा (30) असे त्याचे नाव असून त्याला डी. बी. मार्ग पोलिसांनी दरभंगा येथून बिहार पोलिसांच्या मदतीने पकडले.

बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रिलायन्स हॉस्पिटलमधील फोन खणाणला आणि एकच खळबळ उडाली. निनावी फोन करणाऱया कॉलरने हॉस्पिटल तसेच अंबानी यांचे ‘अॅण्टेलिया’ हे आलिशान घर उडवून देणार तसेच अंबानी कुटुंबीयांतील काही सदस्यांना ठार मारणार असे धमकावले. त्यामुळे लगेच हॉस्पिटलकडून डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

या प्रकरणी गुन्हा दाखल करून कॉलरचा शोध घेत असतानाच संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्याच क्रमांकावरून हॉस्पिटलमध्ये फोन आला. त्याच कॉलरने कॉल करून पुन्हा धमकावले. प्रकरण गंभीर असल्याने उपायुक्त नीलोत्पल यांनी तीन पथके तयार करून कॉलरचा कसून शोध सुरू केला तेव्हा धमकीचे कॉल आले तो नंबर बिहारच्या दरभंगा येथील राकेश मिश्रा या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने बुधवारी मध्यरात्रीच्या वेळेस राकेशला ताब्यात घेतले. राकेश शिकलेला असून कामधंदा करीत नाही. राकेशने असे धमकीचे पह्न का केले याची पोलीस आता चौकशी करीत आहेत.