आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे बछडे दिसल्याने घबराट

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे दर्शन बिबट्याचे हल्ले, बिबट्याचे बछडे आढळणे ही नियमित बाब झाली आहे. शिंगवे येथिल पाबळे मळ्यात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आल्याने ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

ही घटना गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यातील एक बछडा उसाच्या शेतात निघून गेला. तर दुसरा बछडा वनविभागाच्या ताब्यात सुखरूप आहे. आज सायंकाळी त्याच जागेवर बछडा पुन्हा सोडून देऊन आईकडे पाठवणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी सांगितले.

शिंगवे येथील पाबळे मळ्यातील ज्ञानेश्वर बाळू पाबळे यांच्या शेतात गुरुवारी सकाळी ऊसतोड सुरू झाली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. त्यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये घबराट पसरली. त्यांनी लगेचच आरडा ओरडा केला. यामुळे दोन बछड्यांमधील एक बछडा उसाच्या शेतात निघून गेला. दुसरा बछडा वनविभागाच्या ताब्यात सुखरूप आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन बछड्याला ताब्यात घेतले. पाबळे मळा परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. तेथे अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. उसतोडणी सुरू असल्याने उसतोड कामगार, शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सदर ऊसतोडणी थांबविण्यात आली असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घटनास्थळी बिबट्याच्या बछड्याला पुन्हा त्या जागेवर ठेवण्यात येणार असून सभोवतालच्या बाजूला ट्रॅप कॅमेरे बसवून बछड्याला मादी बिबट्या घेऊन जाते की नाही, हे पाहण्यासाठी नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती स्मिता राजहंस यांनी दिली.