
>> मंगेश उदगिरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
पक्या आणि अन्या या जोडगोळीचा एक अतूट हिस्सा म्हणजे निवर्ती! याला निवृत्ती या नावाने कुणीच ओळखत नसे. तर हा निवर्ती म्हणजे आमच्या त्रिमूर्ती नगरचा वॉचमन! दिसायला आढाळपाळ असला तरी स्वभाव मऊ आणि स्थायिभाव बावळट या सदरात मोडणारा! या दुकलीने याला इतक्या वेळा फसवून त्रास दिला असला तरी हा अजूनही या दोघांच्या चरणाशी निष्ठा वाहून आहे. यांचा वेळ घालवण्याचा स्रोत म्हणजे निवृत्ती! हे दोघे दिसले की, याने शिव्यांची लाखोली वाहिलीच! आमच्या नगरात एक वयस्क फौजदार राहायचे. सगळ्यांप्रमाणे हे दोघेही त्यांना ‘काका’ संबोधायचे आणि तेवढय़ावर न थांबता निवृत्तीला ‘काकू’ म्हणून हाक मारायचे! यामागचे रहस्य मला तरी कधी उलगडले नाही. त्रिमूर्ती नगरमध्ये मी दुसरे घर बांधले तेव्हा हे दोघे मुक्कामाला माझ्याकडेच असायचे. दोघेही निशाचर. रात्री बारा, एक, दोनपर्यंत हसणे, खिदळणे चालू असायचे. निवृत्तीची एंट्री बाराच्या सुमाराला व्हायची. त्याची फिरकी घ्यायचे प्लॅन तयारच असायचे! निवृत्तीची एक सवय म्हणजे जिथे हे झोपलेले असायचे त्या हॉलच्या खिडकीचे गज धरून यांना मनसोक्त शिव्या घालणे!
‘कारे ए गाबडीच्यांनो! झोपा लागल्या का बे कडू नो! ए, पक्या, अन्या तुमच्या मायला तुमच्या!’ इत्यादी.
एके दिवशी अन्याने इलेक्ट्रिकची वायर उघडी करून खिडकीच्या गजाला जोडली, दुसऱया टोकांना प्लग लावून खटका चालू केला! रात्री निवृत्तीची स्वारी आली! फाटक उघडून शिव्या घालतच मध्ये आला,
‘तुमच्या मायला तुमच्या, आयघाल्यांनो उटा!’ असं बडबडत खिडकीच्या गजाला हात घातला आणि
‘अगं मायोव! असं किंचाळून बाजूला झाला, तोपर्यंत पक्याने लाइट लावला. अन्याने वायर गुंडाळून ठेवली होती!
‘काय झालं निवर्ती?’ साळसूदपणे पक्याने विचारले!
‘तुझ्या मायचा काळतोंडय़ा! तोंड वर करून विचारतोस व्हय रे भाडय़ा!’
‘तू शिव्या दे! पण काय झालं ते सांगशील की नाही?’
‘शाट लागला!’
‘कसा?’
‘तुमा दोगांना काय आज वळखतोय काय मी? ए अन्या, काय केलास ते सांग न्हाईतर टक्कूरच फोडतो बघ!’
‘तू आत येऊन बघ! कायच नाही!’
निवृत्तीच्या शिव्या, यांचे हसणे हे ऐकून मीही आतल्या खोलीत पांघरूणाचा बोळा तोंडात घातला होता!
आम्ही दोघे वरच्या खोलीत झोपायचो. त्यामुळे खाली यांचेच राज्य! एकदा रात्री असाच निवृत्ती या दोघांचा उद्धार करत आला.
‘निवर्ती! बरं झालं वेळेवर आलास!’
‘काय झालं बे कडूवांनो ?’
‘अरे, आतल्या बाथरूममध्ये खुडखुड वाजायलय, मध्येच फूस फूस आवाज येऊ लागलेत, जरा बघतोस का ?’
‘ऊं! म्हनून घाबरायलेत का ? चला!’
पक्याने त्याला आत घेतले. अन्याने मध्ये बाथरूमपर्यंत नेले. हा मध्ये गेला की, बाहेरून कडी घालून लाइट ऑफ करून टाकला!
‘अबे साल्यांनो, दार बंद का केलं रे ?’
बाहेर हे दोघं हसायला लागलेले!
‘अरे दार उगडा की रे !’
‘आम्हाला रोज शिव्या देतो का बे साल्या! आता मधी बसून शिव्या घाल!’
‘ए! परकास, अनिल! आरं तुमच्या पाया पडतो! उगडा रे दार!’
जवळपास दोन तासांनंतर दार उघडलं गेलं. घामानं थबथबलेला निवृत्ती बाहेर पडला आणि धुमाकूळ सुरू.
झाला! अचकट विचकट शिव्या देत काठी उगारून हा मागे आणि हे दोघे पुढे! शेवटी हसू दाबत मी खाली आलो. चहा केला, त्यांच्यात थोडा समेट करून दिला. तेव्हा वातावरण थोडं शांत झालं. चहा पितानाही हे दोघे ठसका लागेपर्यंत हसत होते, मीही त्यात सामील झालो होतो आणि मुख्य म्हणजे निवृत्तीही मिशीतल्या मिशीत हसायला लागला होता!
रेखाचित्र : संजय मिस्त्री





























































