
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे मधुर हास्य जसे प्रसिद्ध आहे, तितकेच तिचे हापूस आंब्यांवर असलेले प्रेमसुद्धा. रत्नागिरी, देवगड हापूस आंब्यांचा मोसम सुरू होत असतानाच थेट बागेतून आलेल्या आवडत्या ताज्या हापूसची चव कधी एकदा चाखतो असे झालेल्या प्राजक्ताने आपल्या घरी कुटुंबीयांसोबत चक्क आंबा महोत्सव साजरा केला.
हापूसबरोबरच विविध जातीच्या आंब्यांची मजा तिने सहकुटुंब लुटली. लॉक डाऊनमध्ये अनेक शेतकऱयांनी एकत्र येऊन लोकांना आपल्या शेतातला ताजा, स्वच्छ व आहारासाठी पोषक भाजीपाला व फळे ऑनलाइन पद्धतीने घराच्या दारापर्यंत पोहोचविणाऱया ‘किसान कनेक्ट’ या शेतकरी मंचाने आयोजित केलेल्या ऑनलाइन आंबा महोत्सवातून प्राजक्ताने भरघोस आंबा खरेदी करून पुन्हा एकदा शेतकऱयांचे मनोबल वाढविले. त्यांच्याकडून हजारो हापूस आंबाप्रेमींना उत्तमोत्तम आंबा खायला मिळो, या शुभेच्छा दिल्या. शेतकऱयांकडून घेतलेल्या हापूस तसेच केसर, लालबाग, लंगडा अशा रसाळ जातींच्या आंब्यांची चव घेताना त्यांच्यातल्या पोषणमूल्यांची माहितीही तिने करून घेतली.



























































