
सामना प्रतिनिधी । नगर
नगर केडगाव दुहेरी हत्याकांडाला काही महिने उलटून गेले नाही तोच पुन्हा केडगावमध्ये एकाचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असा प्रकार घडल्यामुळे पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान हे आपसातील भांडणाचे प्रकरण असून भांडण सोडण्यासाठी गेलेल्या मनोज अंधारे याचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाची कोतवाली पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून केडगाव येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेल आहे.
महापालिका पोटनिवडणुकीत तीन महिन्यांपूर्वी दोन शिवसैनिकांची हत्या झाल्यानंतर प्रचंड दहशतीखाली असलेल्या केडगाव उपनगरात पुन्हा एकदा हत्या झाल्याने वातावरण तणावाचे झाले होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर या भागात काही जणांचा वाद सुरू होता. बाचाबाचीचे हे प्रकरण हाणामारीवर गेले. तेव्हा भांडण रोखण्यासाठी पुढे झालेल्या मनोज अंधारे याचा मारहाणीत मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच केडगावमधील काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. केडगावमधील काही तरुणांच्या मदतीने तीन परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या अंधारे याला नगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. अंधारे याचे पार्थिव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





























































