सरकारने बाजारचाळे बंद करावेत, मनोज जरांगे यांनी ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनेट बंद करून काय होणार? दडपशाही करून मराठ्यांचा आवाज बंद होणार आहे का? सरकारने हे बाजारचाळे बंद करावेत, असे खडे बोल मनोज जरांगे पाटील यांनी मिंधे सरकारला सुनावले. अर्धे रक्त आटल्यावर आता पुन्हा आरक्षण देण्यासाठी वेळ मागत आहेत. वेळ का आणि कशासाठी पाहिजे हे इथे या आणि सांगा. चर्चा करू म्हणता, मग देवेंद्र फडणवीस याच चर्चेला. माझे मराठे तुम्हाला संरक्षण देतील, असे जोरदार आव्हानच जरांगे यांनी दिले.

मराठा आरक्षणावरून झालेल्या अभूतपूर्व कोंडीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परंतु, या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेवर कडाडून हल्ला केला. आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. त्या मुदतीत काय केले? आणि आता वेळ कशासाठी हवा आहे? पडद्याआड काहीही होणार नाही. आंतरवालीत या आणि सांगा, असे जरांगे म्हणाले. वेळ द्यायचा की नाही हे समाजाला विचारून सांगेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांना मराठे अडविणार नाहीत

मराठा आरक्षणाचे आंदोलन अतिशय शांततेत चालू आहे. आरक्षण हा आमचा हक्क आहे, पण सरकारकडून टोलवाटोलवी चालू आहे. मी चर्चेची कवाडे खुली ठेवली आहेत. जोपर्यंत माझ्यात बोलण्याची शक्ती आहे, तोपर्यंत चर्चेला या. पण, सरकारकडून कोणताही प्रतिसाद नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही चर्चा करू म्हणतात. कशाची भीती वाटते तुम्हाला? फडणवीस याच चर्चेला, माझे मराठे तुम्हाला संरक्षण देतील, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी फडणवीसांना चर्चेचे निमंत्रण दिले.

दोन दिवस टीका करणार नाही

सरकार खोडील असल्यामुळे कडक शब्दांत बोलावे लागते. मंगळवारी मी कडक टीका केली. त्यानंतर लगेच मला मंत्र्यांना एकेरीवर बोलू नका, जरा सबुरीनं घ्या, असा मेसेज आला. ठीक आहे. मी दोन दिवस टीका करणार नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. परंतु, सरकारमधील वाचाळांनाही आवर घातला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विनाकारण वातावरण खराब करू नका

जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरची इंटरनेटसेवा बंद करण्यात आली. इंटरनेट बंद करून आमचा आवाज दाबणार का? मराठ्यांचा आवाज आता कुणीही दाबू शकत नाही. असले बाजारचाळे करून सरकार निष्कारण वातावरण खराब करत आहे. इंटरनेट बंद करण्यात आल्याने मला ताब्यात घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लोक रात्रीतून आंतरवालीत जमा झाले. मराठ्यांना नाहक डिवचू नका नसता महागात पडेल, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

पाण्याचा घोटही घेणार नाही

मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली आहे. त्यावर सरकारने चकार शब्दही काढला नाही. रात्रीपर्यंत सरकारला वेळ दिला होता. त्यामुळे आता पाण्याचा घोटही घेणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी निक्षून सांगितले. जरांगे यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आजही डॉक्टरांचे पथक आले होते, परंतु त्यांनी कोणतीही तपासणी करण्यास नकार दिला. त्यामुळे डॉक्टरांचे पथक परत गेले.

अर्धे रक्त आटल्यावर आता वेळ मागत आहेत

सरकारला वेळ का आणि कशासाठी पाहिजे? सरकारला वेळ द्यायचा की नाही, हे समाजाला विचारून सांगणार. चर्चेने प्रश्न सुटेल असे म्हणता… देवेंद्र फडणवीस या चर्चेला
माझे मराठे तुम्हाला संरक्षण देतील