
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया कोलमडली आहे. अकरावी प्रवेशातील मराठा आरक्षणाचे काय होणार याकडे राज्यभरातील मराठा समाजातील विद्यार्थी-पालकांचे डोळे लागले आहेत. आरक्षणापाठोपाठच प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक कधी येणार, अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार तसेच परीक्षा कशी घेणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून यावर मार्ग काढण्यासाठी सोमवार, 14 सप्टेंबर रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई, पुणेसह पिंपरी-चिंचवड, नागपूर, संभाजीनगर, नाशिक, अमरावती जिल्ह्यांतील अकरावी प्रवेशही ऑनलाईन पद्धतीने होत आहे, मात्र न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने या जिल्ह्यांतील अकरावी प्रवेशालाही विलंब होत आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आतापर्यंत झालेल्या प्रवेशावर परिणाम नाही असे स्पष्ट करीत अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेबाबत राज्य सरकारकडून लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आता राज्य सरकारच अकरावी प्रवेशावर निर्णय घेणार आहे.
सोमवारी होणाऱया बैठकीसाठी अकरावीसाठी एकूण उपलब्ध जागा, आतापर्यंत झालेले प्रवेश, उर्वरित रिक्त जागा, मराठा आरक्षणाखाली आलेले अर्ज, आरक्षणाद्वारे मिळालेले प्रवेश आदी माहिती शिक्षण संचालनालयाला सादर करण्यास सांगितल्याचे समजते.
मराठा आरक्षण काढल्यास…
ऑनलाईन प्रवेशाच्या सॉफ्टवेअर- मध्ये बदल होईल. आरक्षणाचा पर्याय हटविण्यात येईल.
ऑनलाईन अर्जातील मराठा आरक्षण (SEBC) हा कॉलमही काढून टाकावा लागेल.
यापुढील गुणवत्ता याद्या या मराठा
आरक्षण न देताच जाहीर कराव्या लागतील.
हे पर्याय विद्यार्थ्यांच्या समोर आहेत
याआधी मराठा आरक्षणाचा लाभ घेत प्रवेश अर्ज भरणाऱया विद्यार्थ्यांना यापुढील गुणवत्ता यादीसाठी खुल्या गटातून प्रवेश अर्ज करावा लागेल.
SEBC गटात मोडणारे तसेच वार्षिक आर्थिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणारे विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटक (EWS) गटातून प्रवेश अर्ज भरू शकतात. या पर्यायांवर सोमवारी मंत्रालयात होणाऱया बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.





























































