
मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून 27 टक्के आरक्षणाचे ओबीसी, भटके विमुक्त आणि मराठा समाजात समान वाटप करण्यात यावे, असा ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी मांडलेला फॉर्म्युला मनोज जरांगे-पाटील यांनी फेटाळला आहे.
ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आज गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. या वेळी उभयतांमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाली. मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करणे शक्य आहे, असे राठोड म्हणाले. परंतु मराठा समाजाची लोकसंख्या पाहता आपले राजकीय आरक्षण धोक्यात येईल, अशी भीती ओबीसींना आहे. त्यावर 27 टक्के राजकीय आरक्षणाचे ओबीसी, मराठा समाज आणि भटक्या विमुक्तांमध्ये समान वाटप करण्यात यावे, असा प्रस्ताव राठोड यांनी मांडला. हरिभाऊ राठोड यांचा प्रस्ताव स्वीकारण्याजोगा नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
हरिभाऊ राठोड यांनी मराठा समाजाला आरक्षण देणे सहज शक्य असल्याचे म्हटले आहे. इम्पिरिकल डेटा आला आहे, त्याच्या आधारे 57 टक्क्यांपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देता येणे शक्य आहे आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणालाही धक्का लागणार नाही, असा दावा हरिभाऊ राठोड यांनी केला.


























































