पुस्तकप्रेमी – उदगीरी बोलीतील शब्दशिल्प…’बगळा’ आणि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’

>>अजिंक्य कुलकर्णी [email protected]

इंग्रजीत एक म्हण आहे ‘मोअर यू पर्सनल,मोअर यू युनिव्हर्सल.’ लेखक हा जितकं जास्त आपल्या मातीतलं, आपल्या परिसरातलं लिहिल तितका तो अधिक वैश्विक होत जातो. आज मराठी साहित्यात असे अस्सल, स्थानिक बोलीभाषेतच लिहिणारे लेखक फार कमी आहेत. अगदीच नाही असं मी म्हणणार नाही. बोलीभाषेत लिहिलं तर आपलं लिहिलेलं कुणी वाचेल का? त्याला वाचक प्रतिसाद देतील का? हा भयगंड असल्यामुळेही कदाचित बरेचसे लेखक स्थानिक बोलीभाषेत लिखाण करताना दिसत नाही. प्रसाद कुमठेकर हे लेखक मात्र याला गोष्टीला अपवाद आहेत. मूळचे उदगीरचे असलेले आणि पेशाने संवाद लेखक असलेले कुमठेकर यांचे नाव आपण विविध वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या मालिकांचे संवाद लेखक म्हणून वाचले असेल.पार पब्लिकेशन तर्फे कुमठेकरांच्या दोन कादंबऱ्या प्रकाशित आहे. एक म्हणजे ‘बगळा’ आणि दुसरी ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’. प्रमाण मराठी भाषेतली पुस्तके जितक्या सहज आणि पटपट वाचत आपण पुढे जातो तितक्या सहजतेने जरी ही दोन पुस्तके वाचता येत नसली तरी वाचकाला एका जागेवर खिळवून ठेवण्याइतपत सशक्त आशय या दोन पुस्तकात नक्कीच आहे.

कादंबऱ्यांच्या आशयाचे आकलन वाचकाला होईल की नाही या भितीला अजिबात थारा न देता, निगूतीने निवेदनासाठी कुमठेकरांनी उदगीरी बोलीभाषेचाच वापर केला आहे व त्या भाषेचा गोडवा हा वाक्यागणिक जिवंत झालेला आपल्याला या कादंबऱ्यांतून पहायला मिळतो.

 

महाराष्ट्रात असे कित्येक गावं, तालुके, जिल्हे आहेत जिथे कधी स्वातंत्र्य युद्ध, क्रांत्या, मोर्चे, आंदोलने किंवा काही मोठ्या उलथापालथी असं काही काही घडलेलं नसतं. म्हणजे अभिमानाने छाती फुगवली जावी असा कोणताही ऐतिहासिक वारसा नसलेली सुद्धा कित्येक गांव असतात. त्या लोकांकडे सांगण्यासारखी अशी कोणतीच गोष्ट नसणे यातच एक गोष्ट लपलेली असते, ती म्हणजे साध्या माणसांची साधी गोष्ट. ज्यांनी कधी आयुष्यात फार मोठा असा संघर्ष केलेला नाहीये, ते अगदी सर्वसामान्य आयुष्य ते जगत असतात. दहावी, बारावी, डिग्री, छोकरी आणि मग झुर्रर्रर्र! अशा साध्या माणसांच्या साध्या गोष्टी म्हणजे ‘बगळा’ आणि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ होय. बगळा व बारकुल्या…. चे कथानक ज्या वातावरणात घडते आहे तिथे जात-पात धर्म असूनही त्यांच्यात तंटेबखेडे नाहीयेत. एकमेकांबद्दल आदर सद्भाव आहे. या दोन्ही पुस्तकात एकही व्हिलन आपल्याला पहायला मिळत नाही. अशी स्वच्छ, निर्मळ मनाची ही माणसे आहेत.

 

बगळा या कादंबरी बद्दल बोलायचं झालं तर, त्या कादंबरीची गोष्ट अगदी साधी आहे. चिंतामणप्रसाद पुरूषोत्तम सरदेशमुख उर्फ चिंत्या हा इयत्ता पाचवीत शिकणारा एक निरागस मुलगा. मित्रांसोबत क्रिकेट खेळताना हा फिंल्डींग करत असतो. याच्या हाताला बाॅल चाटून जाऊन काटेरी झुडपात हरवतो. चिंत्याच्या भाषेत सांगायचं तर बाॅल बाभळीत झुर्रर्रर्रर्र झाल्ता. केवळ चिंत्याच्या हाताला बाॅल लागून हरवला म्हणून त्याचे मित्र त्यानेच बाॅलची भरपाई करून दिली पाहिजे असा दम देतात. त्यासाठी चिंत्याला अकरा रूपये हवे असतात. आता ते पैसे आणायचे कुठून तर कुणीतरी चिंत्याला सल्ला देते की, गावातल्या तळ्यावरील बगळे पकडून व ते विकून बाॅलची भरपाई करता येईल. चिंत्याला हा सल्ला पटतो व तो बगळे पकडण्यासाठी शाळेच्या मधल्या सुट्टी नंतर रोज शाळा बुडवतो व त्या बाॅलची भरपाई कशी करतो.

 

या अशा इतक्या साध्या कथानकात इतक्या गमतीजमती घडतात की हसून हसून कधी डोळ्यात पाणी येतं ते कळतही नाही. चिंत्या या पात्राशी आपण एकरूप होतो त्याचे महत्वाचे कारण म्हणजे चिंत्याचा स्वभावासारखं एखादं का होईना ‘पात्र’ आपल्या प्रत्येकाच्या शालेय जीवनात असतंच असतं.या पात्रांच्या अंगात खोडकर, नादिष्टपणा ठासून भरलेला असतो. त्यांच्या या ‘गुणांचा’ त्यांच्या मित्रांना कुटुंबातील लोकांना त्रासही होतो. पण तरीही चिंत्यासारखी व्यक्ती आपल्याला नेहमी आपल्याजवळ हवीहवीशी वाटत राहते. शाळेत जर ते गैरहजर असतील तर त्यांची गैरहजेरी आपल्याला खटकते. ‘तो’ आज का आला नाही ही चौकशीही आपण करतो. लहान वयात आपण बऱ्याच वेळा आपल्या मनातील शंका मोठ्यांना विचारण्यास कचरतो पण ही चिंत्यासारखी मंडळी बिनघोरपणे कुणालाही सहज भिडतात. कुणाचीही विचारपूस ते “कशा आहात काकू? , काय चाललयं? असं मायाळू बोलणं यांना फार जमतं. शालेय जीवनातील गमती-जमती फार सुंदररित्या चित्रित केल्या आहे या कादंबरीत. जसे शाळेतील शिपाई लोकांची एक सुप्त इच्छा असते की त्यांना काका, मामा म्हणून हाक न मारता ‘सर’ म्हणून हाक मारावी.

 

चिंत्या समाजातील त्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतो जो स्वभावाने एकदम साधे असतात. ज्यांना कुणालाही सहज चटकन नकार देणे जमत नाही. चिंत्यासारखी मंडळी ही ती मंडळी असतात ज्या प्रगतीपुस्तकावर सो काॅल्ड ‘हुशार’ चा शिक्का मारलेला नसतो. चिंत्या सारखी मंडळी ही नादिष्ट असतात. त्यांना जगाबद्दल, जगण्याबद्दल प्रचंड कुतूहल असते. ते कुतूहल शमवण्याचा ते आपआपल्या परीने प्रयत्नही करतात. केवळ पुस्तकी शिक्षण त्यांना एका जागी खिळवून ठेवण्यास अपयशी ठरते. प्रत्येक गोष्ट मुळापर्यंत जाऊन जाणून घेण्याची इच्छा असते यांना हे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे द्योतक आहे.

 

बगळा या कादंबरीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यातले महत्वाचं पात्र चिंत्या हा स्वतः कुठेच फारसं निवेदन करत नाही. कथेतली इतर पात्र मग ते चिंत्याचे मित्र असतील, वडील, काका, बहीण हे चिंत्याबद्दल बोलतात आणि त्यांच्या या बोलण्यातून मग तुम्हा-आम्हा वाचकांना चिंत्या या पात्राचा स्वभाव उलगडत जातो. उदगीरी भाषेतील शब्दांना वाचताना थोडी आपली गती कमी होते पण भाषिक गोडवा मात्र आपल्याला वाचक म्हणून पुरेपुर चाखायला मिळतो. उदा. बघायला- बगटीलं, करायला – करुलालता, देत नाही – दिनागेल्ती, ठरवलेलं – ठरविल्तं.

 

प्रसाद कुमठेकरांची दुसरी कादंबरी आहे ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’. या पुस्तकाला कादंबरी म्हणायचं की लघु कथासंग्रह हा चेंडू कुमठेकरांनी वाचकांच्या कोर्टात ठेवलेला आहे. ‘बारकुल्या…’ वाचताना वाचकांना बोलीभाषेचे एक वेगळेपण जाणवत राहतं. जेवताना पोळी भाजी लागतेच पण म्हणून चटणी लोणच्याचे एक वेगळं स्थान नाकारता येत नाही. गावातील लोकांना शहराचे आकर्षण वाटू लागल्यापासून त्यांना बोलीभाषा जणू कमअस्सल वाटू लागल्या आहेत. प्रमाण भाषेचे असलेलं वर्चस्व त्यात क्रमिक पुस्तके ही प्रमाण भाषेत असल्यामुळे त्यातलीच भाषा शुद्ध (?) आणि बोलीभाषा अशुद्ध (?) असं कसं असेल? ‘बारकुल्या…’ च्या प्रस्तावनेत कुमठेकरांनी म्हटल्याप्रमाणे, “आता आमच्यावर पुणे मुंबई चढायला लागलंय. आणि आम्ही आमच्या ‘अस्सल बोलीचं वान’ कोरड्या आडात टाकून ‘हायब्रीड’ होण्याचा चंग बांधलाय. पण का? मुळात भाषेचा जन्म हा बोलण्यासाठी झालेला असल्यामुळे त्याचे मुळ स्वरूप हे बोलीच असते ना. त्यामुळे भाषा कुठलीही असो ती प्रथम बोली आहे. आणि कोणत्याही बोलीला शुद्ध किंवा अशुद्ध या कॅटेगीरित टाकताच येत नाही.”

 

प्रमाण भाषेतच लिहिण्याच्या आग्रह धरण्याच्या या काळात ठरवून ‘उदगीरी’ या बोलीभाषेत लेखन करण्याचा निर्णय हा कुमठेकरांची प्रयोगशीलता दाखवते.’बारकुल्या…’ मध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींमधून ग्रामीण भागातील माणसांचे स्वभाव, त्यांची मने, त्यांचे संस्कार,ते पाळत असलेल्या रुढी,परंपरा इ. कुमठेकर उलगडून दाखवतात. शिक्षणामुळे शहराचा ध्यास लागलेली तरुणपीढीला जेव्हा आपल्याच वावरात यायची लाज वाटते तेव्हा त्यांच्या बापाच्या मनाची झालेली कालवा कालव सांगणारी ‘येडी बाभळ’ ही कथा. गावात व्याजाने पैसेपैसे देणारा ‘कारभारी’ गावाच्या पाटलाचे आपल्या घोड्यावर (गंगापाट) असलेलं प्रेम. त्याच प्रेमापोटी तमाशा सादर करणाऱ्यांनाही तो ‘गंगापाट’ शब्द असलेलीच गाणीच सादर करण्याचा करत असलेला आग्रह. या आणि अशा विविध कथांमधून कुमठेकर एक अख्खं गाव या पुस्तकात आपल्या नजरेसमोर उभं करतात. विविध वयोगटांचे फक्त पुरूषच या कथांमध्ये निवेदन करताना दिसतात. एकही स्री पात्र कथांमध्ये नाही हे आजही गावाकडील पुरुषप्रधान संस्कृतीचे सुचक वाटते. ग्रामीण भागातील मानवी मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न होताना दिसतो तोही अस्सल उदगीरी भाषेत.

 

आज गाव खेड्यांचे होत असलेलं अंध आधुनिकीकरण. त्यात कुचंबणा होते आहे पन्नाशीत असलेल्या लोकांची. मुलांची आधुनिक स्वप्नात त्यांना आपले स्थान आहे की नाही हा प्रश्न त्यांना पडलाय. जागतिकीकरणाच्या या काळात त्यांचे संदर्भ तपशीलवार या कथांमध्ये जे रंगवलेले आहेत ते एकाच वेळी रंजकही वाटतात आणि अंतर्मुखही करतात.बारकुल्या…’ बद्दल वर म्टल्याप्रमाणे मागच्या दोन दशकांमध्ये झाललं जागतिकीकरण, त्या जागतिकीकरणाचे बोलीभाषांवर झालेले चांगले/वाईट परिणाम याचा धांडोळा मराठी साहित्यामध्ये घेतल्याचे जाणवत नाही. बारकुल्या…’ मधून कुमठेकरांसारखे अपवादात्मक लेखक या अशा विषयावर लेखन करतात ते ही उदगीरी या बोलीभाषेत. मराठी साहित्यातील पारंपरिक पठडीतले सर्व फाॅर्म कुमठेकरांनी या पुस्तकात मोडीत काढलेले आहे. धिऱ्या, बंचर, सर्जी, शांतूकाका, मोरे गुर्जी, सदऱ्या, ही आणि अशी कितीतरी पात्र आपल्या भोवतीचा परिसर त्या त्या कथेमध्ये जिवंत करतात.

 

कुमठेकरांनी या सर्व कथांमधून ग्रामीण मानवी मनाचा एक मिस्किलपणा दाखवला आहे. उदा. कारभारी कथेत कारभारी आपल्या गाडीवर एक स्लोगन टाकतो,”जो सबको तारी वही संतुक कारभारी”, “जिस बंदे को है सच्चे प्यार का साथ उसपे कारभारी का हात” अशा मिस्किलपणाची रेलचेल आहे या कथांमध्ये. शेवटी लास्ट बट नाॅट द लिस्ट बारकुल्या…’ चे मुखपृष्ठ व आतील चित्र. पेन, पेन्सिल न उचलता जी चित्रं काढलेली आहेत ते अगदी तंतोतंत कथांना लागू होतात. मानवी मनाचा तळ गाठण्यासाठी कुमठेकर जे सांगू पाहत आहेत ते अतिशय उत्कट,प्रामाणिक आणि रंजक पद्धतीने सादर केलेले आहे. ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ही कादंबरी म्हणजे बोली भाषेतील एक समर्थ आविष्कार आहे.

 

पुस्तक:- ‘बगळा’ आणि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’


लेखक:- प्रसाद कुमठेकर

प्रकाशक:- पार पब्लिकेशन