मुद्दा – महाराष्ट्रात मराठीच हवी!

829

>> स्वामी गंगाधर

मराठी राजभाषा होऊन बरीच वर्षे झाली. मंत्रालयात व महाराष्ट्रात सरकारी व सहकारी कामात मराठीचा वापर चालू झाला. अगदी अलीकडे नगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेचे रूपांतर एडीसी बँक झाले आहे. तसेच तेथील कर्मचारी पासबुक इंग्रजीत भरीत आहेत. असे अनेक खात्यांत होत असेल तर मराठी इथे आहे, पण दिसत नाही असे वाटते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याच्या सर्व भाषा आपल्या भाषा राज्यकारभारात वापरायला स्वतंत्र झाल्या. मग मराठी भाषाच कशी पारतंत्र्यात आहे? हिंदुस्थान गुलामीतून स्वतंत्र झाला म्हणजे त्याचे रूपांतर (Conversion सार्वभौम) राष्ट्रात झाले. तो इंग्रजांचा व इंग्रजी भाषेचा गुलाम नाही. एखाद्या माणसाचे धर्मांतर झाले तर तो नवीन धर्म पाळतो. त्या धर्माची भाषा वापरतो. हिंदुस्थानचे त्याचप्रमाणे धर्मांतर किंवा रूपांतर झाले आहे. त्याचा धर्म गुलामाचा नसून स्वतंत्रतेचा आहे.

या लेखाच्या लेखकाचे म्हणणे आहे की, इंग्रजी शिकण्याच्या नादात मातृभाषेला अव्हेरण्यात आपलाच तोटा आहे. मातृभाषेचा, एका भाषेचा ऱहास होईल, त्याअगोदर आपला ऱहास झालेला असेल. आपल्या जीवन व्यवहारासाठी तरी आपण मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे. स्वतःसाठी मातृभाषेत शिकायला हवे.

मी अनेकदा माझ्या लेखनातून सर्व शाळांत मराठी सक्तीची करावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. मराठी साहित्य परिषदेने लोकांकडून त्यासंबंधित लेख व साहित्य मागविले होते.

सरकारने नेमलेल्या समितीने काय ठरविले आहे ते जाहीर व्हायचे आहे. सरकार सक्तीच्या मराठी शिक्षणाचा निर्णय घेणार आहे. ‘बाहेर सक्ती आणि घरात झुकती’ असे नको. सरकारने सर्व बँका, सरकारी व सहकारी संस्था यांची तपासणी करावी. जे मराठीऐवजी इंग्रजीचा वापर करीत असतील त्यांना काढून टाकावे.

मी अनेक मराठी लोकांना डायरीत इंग्रजीत लिहिताना पाहतो. त्यांचे ते व्यक्तिगत असेल, पण त्यांचा भाषाभिमान मेला आहे काय? गुजराती, ख्रिस्ती व मुसलमान त्यांच्याच भाषेत लिहितात. ख्रिस्ती लोकांनी इंग्रजी स्वीकारली आहे ती त्यांची धर्मभाषा आहे. मुसलमानांनी उर्दू मिश्रित हिंदी स्वीकारली आहे. ती त्यांची धर्मभाषा आहे. गुजराती त्यांची भाषाच लिखाणात वापरतात. ती त्यांची धर्मभाषा व राजभाषा आहे. शीखसुद्धा त्यांच्या भाषेत लिहितात. हिंदू – मग मराठी असो किंवा इतर भाषिक – ते आपल्या भाषेचा अभिमान बाळगत नाहीत. कारण त्यांना आपला धर्म व आपली भाषा यांचा अभिमान नाही. राष्ट्रवादावर व्याख्याने देणारे, सारखे वंदे मातरम् बोलणारे स्वतःच्या भाषेत लिहीत नाहीत. त्यांना तिची गोडी लागत नाही. इंग्रजी, अरबीमिश्रित हिंदी या हिंदुस्थानवर राज्य करणाऱया परकीय आक्रमकांच्या भाषा आहेत. त्यांचा राज्यकारभार त्या भाषांत असल्यामुळे सर्व जनतेला त्या भाषा वापराव्या लागल्या. त्यांचे धर्म स्वीकारणाऱयांना त्यांच्या भाषांचा अभिमान आहे.

आपली प्रतिक्रिया द्या