
महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नामदेव ढसाळ यांचा आज जन्मदिन असून ही घोषणा करण्यात आली आहे. द बायोस्कोप फिल्म्सने ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले आहेत.दोन वर्षांच्या अत्यंत सखोल संशोधन व अभ्यासानंतर हा चित्रपट तयार होत असून यामुळे ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेतला जाईल.
‘ढसाळ’ या चित्रपटाची निर्मिती संजय पांडे हे करणार असून वरुणा राणा यांनी दिग्दर्शनाची भूमिका सांभाळली आहे. तर प्रताप गंगावणे यांनी संवाद लेखन केले आहे. सप्टेंबर 2024मध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होईल आणि 2025मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकेल.
पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. सोशीत आणि अन्यायाने पीडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पॅंथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. त्यांचं जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल आहे. महाराष्ट्रच काय संपूर्ण देशात दलित पॅंथरने एक राजकीय व सामाजिक वादळ तयार केलं होतं. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे हे एक निर्माता म्हणून माझं सौभाग्य आहे आणि आव्हान ही आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या सर्व देश विदेशातील चाहत्यांसाठी, विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ही पर्वणी असेल, असे मत यावेळी निर्माते संजय पांडे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. आज 15 फेब्रुवारी नामदेवचा जन्मदिवस. नामदेव ढसाळ नावाचा झंझावात शांत होऊन 10 वर्ष झाली. नामदेवचं समग्र कलंदरपण, विचारीपण, कविमन आणि माणसांप्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या ढसाळ चित्रपटातून दिसून येईल. या चित्रपटात नामदेवच नाही तर त्यांच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, त्यावेळचं राजकारण, पूर्ण दलित पँथरची दहशत असलेली चळवळ असं सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील. त्यांची बायोपिक हे फक्त वरुणाजींचं स्वप्नच नाही तर हा एक महत्वाचा ऐतिहासिक ‘बखरनामाच’आहे. एका महान लोकनायकाच्या जीवनावर चित्रपट बनविण्याच्या वरुणाजींच्या या महत्वाकांक्षेला माझ्या खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण कष्टांना व तळमळीला कडक सॅल्युट, असे त्या म्हणाल्या.




























































