रौद्ररूप धारण करणाऱ्या नद्या कोरड्याठाक! मराठवाड्याच्या बदलत्या ऋतुचक्राचा अभ्यास कधी होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येच परतीच्या पावसाने बीडमध्ये अक्षरशः जलप्रलय आणला होता. पाण्याचे ओझे सहन न झाल्याने बिंदुसरा, सिंदफणा नद्यांनी अनेक ठिकाणी पात्र बदलले! महापुराची मगरमिठी अशी पडली की, सगळा नदीकाठ वाहून गेला, जमिनी खरवडून गेल्या. काठाशेजारी वाळवंट तयार झाले. रौद्र भीषण रूप दाखवून काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या नद्या आठ महिन्यांत स्वतःच पाण्यासाठी तरसत आहेत! मराठवाड्यातील झपाट्याने बदलणाऱ्या ऋतुचक्राचा येथील पर्यावरणाला बसत फटका असून त्याचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.

गेल्या वर्षी परतीच्या पावसाने बीड जिल्हय़ात तांडव घातले होते. हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, कापसासह खरीप पिकांचा चिखल झाला होता. पावसाचा जोरच एवढा होता की, बिंदुसरा, सिंदफणा या नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमताच महापुरात वाहून गेली. या नद्यांनी आपल्या प्रवासात अनेक ठिकाणी अक्राळविक्राळ रूप धारण केले, किंबहुना या नद्यांना पात्रच राहिले नव्हते. नदीकाठावर या महापुराने हाहाकार उडवला. काठावर शेतीचे नामोनिशाण शिल्लक राहिले नाही. सिंदफणा नदीच्या पाण्यावर पोसलेल्या मोसंबी, डाळिंब, सीताफळ, पेरू, केशर आंब्याच्या बागा पालापाचोळय़ासारख्या वाहून गेल्या. दोन्ही नद्यांच्या काठावर विस्तीर्ण असे वाळवंट तयार झाले. महापुराच्या अफाट ताकदीने जमिनीत दहा दहा फुटाचे खड्डे पडले.

ओल्या दुष्काळाच्या खाणाखुणा पुसल्याही नाहीत

नद्यांच्या प्रवाही भागात महाकाय जलाशय तयार झाले. आभाळाला उसंतच नव्हती. अगदी माळरानावरही पाणीच पाणी होते. आजवरच्या इतिहासात कधीही बीड जिल्हय़ाने असा पाऊस बघितला नव्हता. कहरी पावसाच्या खाणाखुणा अजून नीट पुसल्याही नाहीत तोच निसर्गाने आपले दुसरे कराल रूप बीडकरांना दाखवले. आठ महिन्यांतच या पाणीदार झालेल्या बिंदुसरा, सिंदफणा नद्या कोरडय़ाठाक पडल्या आहेत. पावसाअभावी उघडेवाघडे पडलेले नद्यांचे पात्र बघवत नाही.

विहिरी कोरड्या, धरणे कोरडी, मग पाणी गेले कुठे?

गेल्या वर्षी झालेल्या कंबरतोड पावसामुळे भूजल पातळी वाढायला पाहिजे होती. परंतु बीड जिल्हय़ाची भूजल पातळी या वर्षी खालावली आहे. केवळ नद्याच कोरडय़ा पडल्या नाहीत तर विहिरी आटल्या आहेत, धरणे कोरडी पडली आहेत. लहानमोठे जलाशय तर पाण्याचे दान मागत आहेत. गेल्या वर्षी ओसंडून वाहणारा बीड जिल्हा आता पाण्याच्या थेंबाथेंबासाठी तरसत आहे. ही परिस्थिती का ओढवली? कोण आहे या परिस्थितीला जबाबदार? एवढा पाऊस पडूनही पाणी गेले कुठे? याचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.

मूर पाऊस गेला, धो धो पावसाचे प्रमाण वाढले

गेल्या काही वर्षांपासून मराठवाडय़ात मूर अर्थात भिज पावसाचे प्रमाण वेगाने घटत आहे. पाऊस आला तर धो धो कोसळतो. वेगाने कोसळणाऱया पाऊसधारा हे निसर्गाचे भयंकर रूप अलीकडे वारंवार बघायला मिळत आहे. भिज पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाणही घटले. गावखेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र सिमेंटचे जंगल उभे राहिले. पडीक शेती कमी झाली. बेसुमार जंगलतोडी, गावाभोवतीच्या निसर्गाच्या पहारेदार असलेल्या डोंगररांगा गायब झाल्या. या सगळय़ाचा एकत्रित परिणाम सध्या बीडकर भोगत आहेत.