
सुधीर नागापुरे, माजलगाव
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील घटनेच्या निषेधार्थ मातंग बचाव कृती समितीचे वतीने मंगळवारी तहसीलवर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील वाकडी या गावी मागील आठवड्यात दलित समाजातील लहान मुलांना राहूल चांदणे, सचिन चांदणे यांना विहीरीत पोहण्याच्या कारणावरून नग्न करून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा विडिओ व्हायरल झाल्याने या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात वादळ उठले.
घटनेतील मारहाण करणाऱ्य प्रल्हाद लोहार, ईश्वर जोशी यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून मंगळवारी मातंग समाज बचाव कृती समितीचे वतीने भास्कर शिंदे यांचे नेतृत्वाखाली साठे चौकातून सकाळी साडेअकरा वाजता अर्धनग्न मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आलाय. घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसील कार्यालयात गेल्यानंतर तेथे तहसीलदार झम्पलवाड हे मोर्चाला सामोरे गेले. त्यांनी निवेदन स्वीकारून मोर्चेकऱ्यांच्या भावना शासनाला कळवण्यात येईल असे आश्वासन दिले. या मोर्चात रणजित कसबे, प्रदीप तांबे, गुलाब ढगे, धनु पाडुळे, विजय वाघमारे, प्रभू घोरपडे, अजय वाघमारे, यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.




























































