
सामना प्रतिनिधी । पणजी
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या दीर्घकालीन आजारपणाचे पडसाद राजकरणाबरोबरच समाजकारणावर उमटू लागले आहेत. आता तर राज्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्ष एकत्र आले असून उद्या पर्रिकर यांच्या दोन पावलं येथील खाजगी निवासस्थावर सामाजिक कार्यकर्ते निमसरकारी संस्था आणि काँग्रेससह अन्य काही पक्षाचे पदाधिकारी मिळून मोर्चा काढणार आहेत.
पर्रिकर यांनी आजारी असून देखील मुख्यमंत्री पदाची सुत्रे स्वतःकडे ठेवली असल्याचा परिणाम प्रशासनावर होऊ लागला आहे. विरोधी पक्षा पाठोपाठ घटक पक्ष, मंत्री आणि आमदार देखील आपली नाराजी व्यक्त करु लागले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन चालावे म्हणून पर्रिकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा अन्य एखाद्या मंत्र्याकडे सोपवावा अशी मागणी करत आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी पणजी येथील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. स्वातंत्र्य सैनिक दाद देसाई, भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे नेते व निवृत्त आयएएस अधिकारी अरविंद भाटीकर, हायकोर्टाचे वकील आयरिश रॉड्रीग्ज, माजी मुख्यमंत्री रवी नाईक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, अमरनाथ पणजीकर, सामाजिक कार्यकर्ते सॉटर डिसोझा, अॅड. यतिश नायक, डॉ. प्रमोद साळगावकर, पणजीचे माजी महापौर यतिन पारेख, प्रसाद आमोणकर आदीनी आज घाटे यांची भेट घेतली.
भेटी नंतर पर्रिकर यांनी राजीनामा द्यायलाच हवा, राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झालेला आहे, अशी मागणी रवी नाईक व आयरिश रॉड्रिग्ज यांनी केली आहे.
उद्याच्या मोर्चात आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी पुढे आलो आहोत. आम्ही शांतपणे मोर्चा नेऊ व पर्रिकर यांची भेट घेऊन त्यांच्या आरोग्याची सद्यस्थिती काय आहे ते जाणून घेऊ असे रॉड्रीग्ज यांनी सांगितले.
खनिज खाणप्रश्नी भाजपाने गोमंतकीयांना फसवले हे कायदा मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर नव्याने उघड झाल्याची टीका गिरीश चोडणकर यांनी केली. एमएमडीआर कायदा दुरुस्त करता येणार नाही अशा प्रकारचा सल्ला केंद्रीय कायदा मंत्रालयाने दिल्याचे राष्ट्रीय इंग्रजी दैनिकांनी समोर आणले आहे. त्या पार्श्वभूमीवर चोडणकर बोलत होते. एनजीओंकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जो मोर्चा काढला जाईल त्यात आम्ही सहभागी होऊ, असे चोडणकर यांनी स्पष्ट केल्यामुळे उद्या पोलीस यंत्रणेची घावपळ उडणार आहे.





























































