कढीपत्त्याच्या नावाखाली Amazon द्वारे गांजाची विक्री?

ऑनलाईन विक्री करणारी जगप्रसिद्ध वेबसाईट Amazon द्वारे गांजाची विक्री केली जात असल्याची गंभीर तक्रार व्यापारी संघटनेने (Confederation of All India Traders) केली आहे. संघटनेचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी या प्रकाराची NCb द्वारे चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. व्यापारी संघटनेने एक पत्रकार परिषद बोलावली होती, या पत्रकार परिषदेत खंडेलवाल यांनी ही मागणी केली.

मध्य प्रदेश पोलिसांनी भिंड जिल्ह्यात रविवारी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका हॉटेलमधून 20 किलो गांजा जप्त केला होता. यावेळी पोलिसांनी 2 जणांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीमध्ये अमेझॉनद्वारे गांजाची आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून तस्करी केली जात असल्याचं कळालं होतं. या दोघांनी 4 महिन्यात जवळपास एक हजार किलोची अमेझॉनद्वारे तस्करी केली असल्याची धक्कादायक बाब पोलिसांनी उघडकीस आणली होती. या गांजाच्या विक्रीदरम्यान 1.10 कोटी रुपयांचा व्यवहार झाला असल्याची माहिती भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले. पोलिसांना आता या प्रकरणामध्ये एकूण 10 आरोपींचा शोध लावायचा असून त्यातील 4 जणांची नावे पोलिसांना कळाली आहेत.

गांजाचे तस्कर हा गांजा कढीपत्ता असल्याचं सांगून अमेझॉनद्वारे देशभरातील त्यांच्या दलालांना पाठवत होते असा दाट संशय पोलिसांना आहे. अमेझटॉनद्वारे गांजा तस्करीचं हे जाळं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान असं पसरलेलं असावं असा पोलिसांना अंदाज आहे. या प्रकाराबाबत अमेझॉनने सावध भूमिका घेतली असून त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की या व्यवहारात गुंतलेल्या अमेझॉनशी निगडीत व्यापाऱ्याने नियमांचे उल्लंघ केले आहे अथना नाही याचा शोध घेतला जात आहे. पोलीस तपासात अंमली पदार्थ तस्करीमध्ये अमेझॉनचा हात असल्याचे सिद्ध झाल्यास अमेझॉनविरूद्धही कारवाई केली जाऊ शकते.