
‘हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर अवघ्या 10 दिवसांत अदानी उद्योगसमूहाला जबरदस्त हादरा बसला आहे. शेअर्सची वाताहत सुरूच असून, आतापर्यंत 118 अब्ज डॉलर्सचा फटका बसला. अदानी एंटरप्रायझेसने आपला एफपीओही रद्द केला आहे. त्यामुळे शेअर बाजारातही मोठी खळबळ उडाली. हा आकडा अदानी समूहाच्या एकूण संपत्तिमूल्याच्या 50 टक्के आहे.
या दरम्यानच आता सेबी देखील अदानींना झटका देण्याच्या तय़ारीत असल्याचे समजते. बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) चे अधिकारी अदानींच्या प्रकरणात लक्ष घालणार आहेत.
शनिवारी सेबीने एक पत्रक जारी करत म्हटले की, बाजारात निष्पक्षता, कार्यक्षमता आणि मूलभूत तत्त्वे राखून ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेअर बाजार सुरळीत व पारदर्शक पद्धतीने चालावा याची आम्ही खात्री करत असतो. गेल्या आठवड्यात अदानी समूहाच्या समभागांच्या किमतीत असामान्य चढ-उतार दिसून आले. अशी काही विशिष्ट प्रकरणे आमच्या निदर्शनास आली असून, सेबी त्यांची तपासणी करून योग्य ती कारवाई करेल.




























































