
लग्नासाठी मुलगी दाखविण्याचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी नेत चौघांना मारहाण करीत 1 लाख 91 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नगर तालुक्यातील वाकोडी येथे घडली. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी एकाला अटक केली असून, उर्वरित आरोपी फरार आहेत. रामदास भाऊसाहेब उमाप (पुणेवाडी, ता. पारनेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बबुशा गहिना रेपाळे यांनी तक्रार दिली आहे.
बबुशा रेपाळे यांची पत्नी मतिमंद आहे. त्यामुळे तिला घरातील काम जमत नाही. त्यामुळे तुमची बायको मतिमंद असल्याने तुम्हाला दुसरी बायको करायची का, अशी विचारणा उमाप व आढाव यांनी रेपाळे यांना केली. त्यावर त्यांनी लग्नाला होकार दिला. त्यामुळे दुसऱया दिवशी मुलगी पाहायला जायचे असून, मुलीच्या वडिलांना एक लाख रुपये द्यावे लागणार असून, बँकेतून पैसे काढून आणण्यात त्यांनी रेपाळे यांना भाग पाडले. नगरला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यास तसेच मुलगी पसंत पडली तर लगेच उरकून येऊ, त्यासाठी मंगळसूत्रही विकत घेतले.
भिका राघू रेपाळे, बजाबा पाटीलबा रेपाळे, मारुती गहिना रेपाळे यांच्यासह रामदास उमाप यांची पत्नी शिलाबाई रामदास उमाप हे नगर येथे गेले, तर रामदास उमाप व अशोक आढाव हे दोघे दुचाकीवर आले. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास नगर तालुक्यातील वाकोडी शिवारातील शेतामध्ये अशोक आढाव सर्वांना घेऊन गेला. येथे मुलगी आहे असे सांगत त्याने सर्वांना खाली उतरण्यास भाग पाडले. तेथे अगोदरच त्यांचा पाच ते सहा साथीदार उपस्थित होते. त्यांनी हातातील काठय़ांनी सर्वांना मारहाण करून बबुशा यांच्या खिशातील दहा हजार रुपये, 15 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, विजय शेरकर याचा 12 हजार 500 रुपयांचा मोबाईल, भिका रेपाळे यांच्याजवळील 50 हजार रुपये, त्यांच्याकडेच ठेवण्यासाठी दिलेले 1 लाख रुपये, मारुती गहिना रेपाळे यांच्या खिशातील 4 हजार रुपये काढून घेतले.
तक्रारीसाठी द्राविडी प्राणायाम
रहाण करून लूट झाल्यानंतर घाबरलेले सर्वजण पारनेर पोलीस ठाण्यात आले. परंतु घटना नगर भागात घडल्याने त्यांना भिंगार पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. ते भिंगार येथे गेल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून ते आमच्या हद्दीत नसून, नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असल्याचे सांगण्यात आले. नगर तालुका पेलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात पाठविले. कोतवालीच्या पोलिसांनीही घटनास्थळ पाहिल्यानंतर ही हद्द नगर तालुका पोलीस ठाण्याचीच असल्याचे सांगत पुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात पाठविले. विनवणी केल्यानंतर तक्रार लिहून घेण्यास तेथील अधिकारी राजी झाले. मात्र, घटनाक्रमास पारनेर येथून सुरुवात झाल्याने पारनेर येथेच गुन्हा दाखल करावा, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱयांनी दिल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.



























































