संसदेत मास्क वापसी! सर्व खासदारांना मास्क वाटले; लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान मोदीही मास्कमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनसह जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता हिंदुस्थानही अॅलर्ट मोडवर आला आहे. गुरुवारी संसदेतही मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही येथे मास्क घातलेले दिसले. सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी खासदारांना मास्क देण्यात आले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व खासदारांना अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान मास्क घालण्याचे आवाहन केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना दक्षता आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, भूतकाळातील अनुभव पाहता आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ओम बिर्ला म्हणाले की, सर्व खासदारांनी मास्क वापरावे. तसेच आपल्या परिसरात जनजागृतीसाठी प्रयत्न करा. सामूहिक प्रयत्नांनी आपण कोरोनाला हरवू असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी बैठक बोलावली

दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. याआधी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले होते की, हिंदुस्थान प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे.

चीनमध्ये कोरोनामुळे विनाश सुरूच आहे. येथे केवळ प्रकरणेच वाढत नाहीत तर मृत्यूही होत आहेत. रूग्णांच्या उपचारासाठी रूग्णालयांमध्ये जागाच शिल्लक नाही, अशी स्थिती आहे. चीनशिवाय अमेरिका, जपानसह जगातील सर्व देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत.

जाणून घ्या जगभरात कोरोनाची स्थिती…

वर्ल्डोमीटर या कोरोनाच्या आकडेवारीवर नजर ठेवणाऱ्या संस्थेनुसार गेल्या 20 तासांत जगभरात 5.37 लाख रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, महामारीमुळे 1396 लोकांचा मृत्यू झाला आहे. 24 तासांत जपानमध्ये सर्वाधिक आढळले आहेत. येथे कोरोनाचे 2.06 लाख रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, 296 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही 50 हजारांहून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. तर 323 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय दक्षिण कोरियामध्ये 88,172, फ्रान्समध्ये 54,613 आणि ब्राझीलमध्ये 44415 रुग्ण आढळले आहेत. तर ब्राझीलमध्ये या महामारीमुळे 197 लोकांचा मृत्यू झाला आहे.