शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात जावून तेथील पदवीधर मतदारांशी संवाद साधतांना संजय मोरे.

सामना प्रतिनिधी । खेड

कोकण पदवीधर मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतली असून मतदार संघातून मिळत असलेल्या पदवीधरांच्या पाठिंब्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे. बुधवारी रात्री खेड येथे झालेल्या पदवीधर मतदारांच्या सभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनाचा विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणुक २५ जून रोजी होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेने खेड तालुक्याचे सुपुत्र आणि ठाणे महानगर पालिकेचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून उमेदवार संजय मोरे व शिवसैनिक कामाला लागले आहेत. मतदारांच्या गाठी-भेटी घेण्याबरोबरच मतदारांना भेडणाऱया समस्या जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला आहे.

ठाणे महानगर पालिकेचे महापौर असताना मोरे यांनी केलेली कामे, घेतलेले धडाकेबाज निर्णय यामुळे ठाणे, पालघर परिसरात त्यांचा सुरूवातीपासूनच पाठिंबा मिळतो आहे. रायगड जिल्ह्याचे तर ते संपर्क प्रमुखच आहेत. त्यामुळे रायगडमध्येही मोरे यांचे पारडे जड आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे असलेले वर्चस्व पाहता त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांचाही अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांची मतदार संघावर असलेली पकड सर्वश्रूत आहे. सामंत यांनी विरोधकांना विजयाच्या हॅटट्रिकची स्वप्न पाहू नका, असा सुचक इशाराही दिला आहे. या सर्व पार्श्वभुमीवर शिवसेनाचा या निवडणुकीत वरचढ चढणार हे स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीत पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार निरंजन डावखरे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अन्य काही उमेदवारही आपले नशीब अजमावण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्य़ात उतरले आहेत. परंतु शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी सगळ्यांसमोर तगडे आव्हान उभे केले असल्याने या निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड मिळणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.

गेले काही दिवस कोकण दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी महाविद्यालयांमध्ये जावून मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरवात केली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी मोरे यांची उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे. आज मोरे यांनी मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात जावून तेथील पदवीधर मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करताना शिक्षकांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ज्या विश्वासाने मला उमेदवारी दिली आहे तो विश्वास मला सार्थ करायचा आहे. यासाठी तुमचे सहकार्य महत्वाचे आहे अशी भावनिक सादही त्यांनी यावेळी मतदारांना घातली.