
कामाचा मोबदला व प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकाऱयांना नगरमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी राहुरी पोलि0.सांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी-कोरडे (वय 39) असे पकडण्यात आलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱयाचे नाव आहे.
तक्रारदार महिला समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीला असून, ऑगस्ट व सप्टेंबर 2021 या दोन महिन्यांचा कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्ता व ऑक्टोबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी तक्रारदार महिलेने बारगाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांची दोन महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी तुला मिळणाऱया पैशांमधील निम्मी रक्कम मला द्यावी लागेल, असे डॉ. वृषाली यांनी सांगितले.
त्यानंतर तक्रारदार महिला एक महिन्यापूर्वी डॉ. वृषाली यांना भेटल्या असता त्यांनी आज काहीतरी रक्कम दिली, तरच मी तुझ्या बिलासंबंधी पुढील कारवाई करण्यास सांगते असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार महिलेने 4 हजार 500 रुपये त्यांना दिले. त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी तक्रारदार महिलेने डॉ. वृषाली यांची भेट घेऊन बिलासंदर्भात विचारणा केली असता, मिळणाऱया बिलातील निम्म्या रकमेची मागणी केली. तडजोडअंती 10 हजार रुपये दिले, तरच तुझे बिल काढले जाईल, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. 6 फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यात डॉ. वृषाली यांनी तक्रारदार महिलेकडे 10 हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
बुधवारी बारगाव नांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना डॉ. वृषाली यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, चालक पोलीस हवालदार हरुन शेख यांनी ही कारवाई केली.