
जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी नावीद बाबू याच्यासोबत फोनवरून चर्चा केली असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवाद्यांशी संबंध असलेले माजी पोलीस अधिकारी दविंदर सिंग यांच्या केसमधील आरोपपत्रात मेहबूबा मुफ्ती यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. एनआयएने एखाद्या केसमध्ये पहिल्यांदाच मेहबूबा मुफ्ती यांचे नाव घेतले आहे.
‘दहशतवादाचा आरोप असेलेले जम्मू कश्मीरचे माजी पोलीस अधिकारी दविंदर सिंह आणि हिजबूलचा दहशतवादी नावीद बाबू यांच्या प्रकरणात मेहबूबा मुफ्ती यांचे नाव समोर आले आहे. मेहबूबा या नावीद याला ओळखतात व त्या त्याच्याशी बोललेल्या देखील होत्या’, असे जनसत्ताने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे.
एनआय़एने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात आणखी तकीन व्यक्तींची नावं असून त्यात पीडीपी युथ विंगचा अध्यक्ष वाहीद उर रेहमानचा देखील समावेश आहे. हा रेहमान हिजबुल मुजाहिद्दीनचे आर्थिक व्यवहार सांभाळतो असा त्याच्यावर आरोप आहे.




























































