मनतरंग – ठाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिव्या नेरुरकर-सौदागर

अनयसारख्या मानसिक अवस्थेतून जाताना वा त्या गंभीर परिस्थितीचा सामना करताना त्या काळात सगळ्यात जास्त गरज असते ती त्याला आहे तसं स्वीकारण्याची. या कठीण काळात मुलं एकटेपणाच्या गर्तेत जातात आणि त्या अवस्थेत त्यांचे नकारात्मक विचार वाढतात. नकारात्मक विचार वाढले की त्यांना नैराश्यात जायला फार काळ लागत नाही. ही मुलं आत्मविश्वास गमावून बसतात. अशा वेळी त्यांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची गरज असते ज्यायोगे ती नैराश्यातून लवकर बाहेर येतील.

‘मला कुठेही काऊन्सेलिंगसाठी जायचं नाहीये. मला उगाच जबरदस्ती करू नका. नाहीतर मी स्वतला खोलीत कोंडून घेईन. समजलं?’ 18 वर्षांचा अनय (नाव बदलले आहे) तावातावाने घरच्यांशी भांडत होता. ‘अरे, तुला प्रॉब्लेम काय आहे? एकदा जाऊन तर बघ. तुझ्या भल्यासाठीच आम्ही सांगतोय ना,’ अनयचे वडील त्याला पोटतिडकीने सांगत होते, पण अनय काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हता. ‘मी तुम्हाला बोललोय त्याचा अर्थ कळलाय ना तुम्हाला? नसेल कळला तर मी पुन्हा सांगतो… मी कुठेही, कोणाकडेही जाणार नाही.’ असं निकराचं बोलणं करून अनयने त्याच्या रूमचं लॉक आतून लावलं आणि तो बाहेर जायची तयारी करू लागला.

त्याला मोबाईलवर ‘बाहेर ये’ असा ओळखीचा मेसेज आलेला होताच. ‘बघा! पुन्हा हा बाहेर. आता रात्री कधी येईल की उद्याच…’ असं काहीसं पुटपुटत त्याच्या आईने कपाळाला हात लावला. तेवढ्यात अनय त्याच्या बाबांकडे वळून म्हणाला, ‘पाच हजार द्या पटकन.’ बाबांनी नाईलाजाने त्यांच्या पाकिटातून पैसे काढले. त्याने ते खसकन खेचले आणि घराबाहेर पडला.

त्या दिवशी तो घरी आलाच नाही. जो आला तो थेट दुसऱया दिवशी रात्री. आई-वडील त्याला फोन लावून थकले होते. दरवेळेस काहीशा गुर्मीत आणि बेफिकिरीत येणारा अनय या वेळेस मात्र त्यांना वेगळाच भासला. काहीसा थकलेला. रात्रभर कदाचित जागरण करून आलेला. पाय ओढतच तो स्वतच्या रूममध्ये गेला आणि जाता जाता सांगून गेला, ‘मला एकटं राहायचंय. प्लीज कोणीही मला डिस्टर्ब करू नका.’ अनयने आईबाबांच्या प्रतिसादाची वाटही बघितली नाही. त्या दोघांना त्याच्या रूमच्या लॉकचा आवाज आला.

पूर्ण रात्र त्या दोघांनी काळजीत काढली. सकाळीही बराच वेळ त्याच्या खोलीचे लॉक उघडले नव्हते. दुपारनंतर अनय हळूहळू बाहेर हॉलमध्ये आला आणि हमसाहमशी रडू लागला. दोघेही त्याच्याजवळ बसले. त्याचं रडणं थांबत नव्हतं. ‘अरे काय झालं?’ असं विचारताच अनयने जे काही सांगितलं ते ऐकून ती दोघं हादरलीच. त्याच दिवशी अनयच्या वडिलांनी समुपदेशनासाठी अपॉइंटमेंट घ्यायचं नक्की केलं.

अनय ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला होता. कॉलेज जरा जास्तच एन्जॉय करत होता. त्याला मित्रपरिवार तसा खूपच होता आणि त्याला नवनवीन मित्र जोडायलाही आवडत होतं. रात्ररात्र घराबाहेर राहणं, पार्टी करणं, चिलआऊट करणं यात तो जास्तच रमत असे. मात्र त्याचा मित्रपरिवार कधी आणि कसा बदलत गेला याचं त्याला भान राहिलं नव्हतं. जे कोणी जुने मित्र त्याचे चांगले होते तेही त्याला सोडून गेले. कारण अनयला नवीन मित्र जोडण्याच्या नादात कोण चांगला आणि कोण वाईट हेच कळेनासं झालं. त्यामुळे त्याच्या जुन्या मित्रांनी काही काळाने त्याला समजावणं सोडून दिलं.

अनय वाईट संगतीला लागला. त्याच्या नवीन मित्रपरिवारामध्ये आता मुलीही होत्या. काही त्याच्याहून मोठ्याही होत्या. या सर्वांबरोबर तो मस्त एन्जॉय करत होता. क्लब्ज, पब्ज या सगळ्या गोष्टी अनयसाठी नित्याच्या झाल्या आणि अशातच एका मुलीशी त्याची जवळीक प्रमाणापेक्षा जास्त वाढली आणि त्या मुलीने त्याच्याशी जबरदस्ती शरीरसंबंध बनवले. ती त्याला ब्लॅकमेलही करू लागली. सारखे-सारखे पैसे उकळून शरीरसंबंधांची बळजबरीही करू लागली. या सर्व प्रकारामुळे अनय नैराश्यात जात होता. त्याला ताण असह्य झाला होता. ‘मग तू आई-वडिलांना का सांगितलं नाहीस?’ असं विचारताच ‘कोण विश्वास ठेवील मॅम माझ्यावर की एका मुलीने मुलावर रेप केलाय?’ असं सांगताना त्याला रडू कोसळलं.

स्त्री किंवा मुलीवर बलात्कार झाला असेल तर आपण त्यावर विश्वास ठेवतो, मात्र एखाद्या मुलावर किंवा पुरुषावर जर बलात्कार झाला असेल तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. वास्तविक कोणावरही हा भयानक प्रसंग घडला असेल तर त्या पीडिताची/पीडितेची काय मानसिक अवस्था होत असेल ही कल्पनाही करणं कठीण आहे. वयात आलेल्या अनयसारख्या तरुण मुला-मुलींच्या वाईट संगतीमुळे निर्माण झालेल्या समस्या हल्ली जास्त बघायला मिळतात आणि त्यासाठी मानसोपचार घेणाऱया मुलांची संख्याही वाढत चालली आहे.

अनयची समस्या गंभीर होती आणि त्याचा परिणाम त्याच्यावर होत होता. म्हणून सुरुवातीला त्याला मानसोपचार (सायकियाट्रिक मेडिसिन्स) सुरू करावे लागले. त्यांच्या जोडीला मग त्याचं समुपदेशन सुरू झालं. ती मुलगी त्याला ब्लॅकमेल करतच होती. त्यावरचा उपाय म्हणून त्याच्या पालकांना पोलिसांची मदत घ्यावी हे सुचवण्यात आलं. त्याप्रमाणे त्यांनी स्वतहून तिला फोन केला जेणेकरून तिला कळेल की अनयसोबत ती दोघंही आहेत. ‘आता अनयला साथ आहे’ हे कळल्यावर तिने त्याला कॉल करणं बंद केलं. तिचे कॉल्स बंद झाल्यावर त्याच्यामध्ये फरक पडू लागला. तो उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देऊ लागला.

अनयसारखी जर कोणाची अवस्था असेल किंवा कोणीही अशा गंभीर परिस्थितीचा सामना करत असेल तर त्याला खंबीर पाठिंब्याची गरज असतेच, पण सगळ्यात जास्त गरज असते ती त्याला आहे तसं स्वीकारण्याची. कारण या कठीण काळात ही मुलं एकटेपणाच्या गर्तेत जातात आणि त्या अवस्थेत त्यांचे नकारात्मक विचार वाढतात. नकारात्मक विचार वाढले की त्यांना नैराश्यात जायला फार काळ लागत नाही. ही मुलं अशावेळी आत्मविश्वास गमावून बसतात. ‘मला काहीच जमणार नाही’ हा विचार त्यांचा पक्का होत जातो. त्यासाठी त्यांना ध्येयनिश्चितीची जाणीव करून द्यावी लागते. त्याच्या जोडीला त्यांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचीही गरज असते ज्यायोगे ती नैराश्यातून लवकर बाहेर येतील.

… आणि जर हा मनस्ताप नको असेल तर वयात आलेल्या मुलांच्या पालकांनीही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. मुलांच्या मित्रपरिवाराबद्दल त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणे, मुलं काय करतात याकडे लक्ष ठेवणं (म्हणजे सुपरव्हिजन नव्हे) तसंच मित्र जर योग्य वळणाचे नसतील तर त्याकरताही मुलांना समज देणं आवश्यक आहे, तरच पुढचे गंभीर परिणाम भोगावे लागणार नाहीत.