एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांचे बीएसएनएलमध्ये विलीनीकरण करा, मुंबई, दिल्लीत सत्याग्रह आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या कर्मचाऱयांचे भारत संचार निगम लिमिटेडमध्ये (बीएसएनएल) विलीनीकरण करा, त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱयांचा थकीत पाच टक्के महागाई भत्ता तत्काळ द्या, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी एमटीएनएलच्या मुंबई आणि दिल्लीच्या कर्मचारी आणि अधिकाऱयांनी टेलिफोन हाऊस येथील कार्यकारी संचालकांच्या कार्यालयासमोर आज एक दिवसाचे सत्याग्रह आंदोलन केले.

भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांच्या सूचनेनुसार, एमटीएनएल कर्मचाऱयांनी आज मुंबई आणि दिल्ली येथे सत्याग्रह आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. ग्राहकांना चांगल्या प्रतीची सेवा देण्यासाठी कर्मचारी कटिबद्ध आहेत. मात्र त्यासाठी आस्थापनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत, असा आरोप कर्मचाऱयांनी केला. एमटीएनएलमधील कार्मिक विभागाच्या अनास्थेमुळे कर्मचारी-अधिकाऱयांचे खूप प्रश्न प्रलंबित आहेत. एमटीएनएलमध्ये आलेल्या कंत्राटी पद्धतीमुळे ग्राहकांना योग्य सेवा मिळत नसून अनेक ग्राहक टेलिफोन आणि मोबाईल सेवा बंद करत आहेत. या सर्व बाबींचा अत्यंत सखोल अभ्यास करून प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही कर्मचाऱयांकडून करण्यात आली. यावेळी महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश शिरवाडकर, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, स्थानिक लोकाधिकार समितीचे सरचिटणीस दिलीप साटम, कार्याध्यक्ष संजय ढोलम, प्रदीप परब, रवींद्र सुर्वे, सुधाकर सावंत, दत्ता भोसले, महेश धुरी, ऑफिसर्स असोसिएशनचे शैलेश भुजबळ उपस्थित होते.