बेकायदेशीर होर्डिंगविरोधात म्हाडा अॅ क्शन मोडवर, प्राधिकरणाच्या जमिनीवरील जुहू-विलेपार्ले येथील होर्डिंग हटवले

घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेपासून म्हाडाने धडा घेतला असून प्राधिकरणाच्या जमिनीवरील बेकायदेशीर होर्डिंग हटविण्यास सुरुवात केली आहे. जुहू -विलेपार्ले येथील शुभ जीवन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील बेकायदेशीर होर्डिंग शुक्रवारी म्हाडा मुंबई मंडळ आणि पालिकेतर्फे निष्कासित करण्यात आला. शुभ जीवन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील 40 बाय 40 फुटाचे होर्डिंग उभारण्यासाठी ‘म्हाडा’चे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नव्हते.

घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी ’म्हाडा’च्या भूखंडावर असलेल्या होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याचे तसेच बेकायदेशीर होर्डिंग तत्काळ हटवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना दिले होते. या सर्वेक्षणात म्हाडाच्या जमिनीवरील 62 पैकी 60 होर्डिंगसाठी म्हाडाची एनओसी घेतली नसल्याचे आढळले. परस्पर पालिकेची परवानगी घेऊन हे होर्डिंग उभारण्यात आले होते. बेकायदेशीर होर्डिंग तत्काळ हटवण्याची कार्यवाही करण्याबाबत म्हाडातर्फे पालिकेला पत्र पाठवण्यात आले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

जाहिरात कंपन्यांना धाडली नोटीस

म्हाडाच्या जमिनीवर होर्डिंग असलेल्या जाहिरात कंपन्यांना म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे नोटीस बजावण्यात आली असून सदर बेकायदेशीर होर्डिंग स्वतःहून काढून घेण्याची सूचना केली आहे. जाहिरात कंपन्यांनी तसे न केल्यास पालिकेच्या मदतीने होर्डिंग निष्कासित करण्यात येणार असल्याचे म्हाडातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित जाहिरात कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

…तर होर्डिंगचा परवाना होणार रद्द

पालिकेतर्फे म्हाडाच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या होर्डिंगबाबत जाहिरातदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. जाहिरातदारांनी अथवा जाहिरात कंपन्यांनी म्हाडा मुंबई मंडळाकडून प्राप्त एनओसी विहित कालावधीमध्ये पालिकेच्या उप आयुक्त (विशेष) यांच्या कार्यालयात सादर न केल्यास सदर होर्डिंगला देण्यात आलेला परवाना रद्द केला जाणार आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका अधिनियम 1888 अन्वये योग्य ती कारवाई केली जाणार आहे.