म्हाडा मुंबई सोडत, अयशस्वी अर्जदारांना सोमवारी मिळणार अनामत रक्कम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाच्या मुंबईतील २,६४० घरांच्या सोडतीत ज्या अर्जदारांना घर मिळालेले नाही, अशा अर्जदारांच्या खात्यात सोमवारपासून अनामत रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. घरासाठी अर्जदारांनी १० हजारांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत अनामत रक्कम भरली होती. तसेच, यशस्वी अर्जदारांनादेखील (विजेत्यांना) सोमवारी सदनिका वितरणाचे प्रथम सूचना पत्र मिळणार आहे.

म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत गुरुवारी पार पडली. या सोडतीत विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव आणि दादर आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील २,६४० घरांचा समावेश होता. सोडतीत ज्यांना घर मिळाले आहे, अशा यशस्वी अर्जदारांना सोमवारपासून प्रथम सूचना पत्र मिळण्यास सुरुवात होईल. सदनिका स्वीकारायची की नाही, हे ठरवण्यासाठी विजेत्यांना १० दिवसांचा कालावधी मिळणार आहे. सदनिका निश्चित केल्यानंतर विजेत्यांना तात्पुरते देकारपत्र (Provisional Offer Letter) पाठवले जाईल. त्यानंतर २५ टक्के रक्कम भरण्यासाठी ४५ दिवसांचा, तर उर्वरित ७५ टक्के रक्कम भरण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी दिला जाईल.