
आखाती युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचे दर वाढले आहे. तसेच जगावर आर्थिक अस्थिरतेचे सावट आहे. तसेच या युद्धाचा देशातील रियल इस्टेट क्षेत्रालाही फटका बसला आहे. यावर्षी देशाच्या स्थावर मालमत्ता बाजारात विक्रमी घरविक्रीची अपेक्षा असताना, आखाती देशातील तणावाने लाखो घर खरेदीदारांच्या आशांवर पाणी फेरले आहे. सध्याच्या तणावामुळे जागतिक व्यापार, वस्तू बाजार आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. देशातील सात प्रमुख शहरांमधील अंदाजे ५,४०,००० फ्लॅट्सचे वितरणाची प्रक्रिया थांबली आहे.
आखाती देशातील दीर्घकाळ चाललेला तणाव आता हिंदुस्थानी स्थावर मालमत्ता बाजारपेठेसाठी आणि सामान्य घर खरेदीदारांसाठी एक मोठी समस्या बनला आहे. या जागतिक संकटामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, सिमेंट, सळई आणि इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सात प्रमुख शहरांमध्ये विक्रमी संख्येने घरांचा ताबा मिळवण्याच्या योजनांना मोठा धक्का बसला आहे.
रियल इस्टेट सल्लागार कंपनी अनारॉकच्या ताज्या अहवालानुसार २०२१ ते २०२३ दरम्यान सुरू झालेले निवासी प्रकल्प आता बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहेत. यामुळे दिल्ली-एनसीआर, मुंबई (एमएमआर), पुणे, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये घरांची संख्या वाढली आहे. मात्र, ताबा आणि विरण प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत होण्याचा धोका आहे.
या जागतिक संकटाचा सर्वाधिक फटका मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि पुण्यातील रिअल इस्टेट बाजारपेठांना बसण्याची शक्यता आहे. यावर्षी देशभरात नियोजित असलेल्या एकूण गृहनिर्माणापैकी ५७ टक्के बांधकाम एकट्या याच दोन शहरांमध्ये होणार आहे. तथापि, या प्रतिकूल परिस्थितीत एक दिलासादायक बाब म्हणजे मालमत्तेची मागणी मजबूत आहे आणि मागील मंदीच्या काळाच्या तुलनेत यावेळी विकासकांची प्रकल्प वित्तपुरवठ्याची स्थिती खूपच चांगली आहे, ज्यामुळे डळमळीत व्यवस्थेला काही प्रमाणात स्थिरता मिळत आहे.
अहवालातील आकडेवारीनुसार, यावर्षी एकट्या मुंबईत अंदाजे २,०७,३०० घरे आणि पुण्यात १,००,३०० घरे वितरित होणार होती, ती आता धोक्यात आहेत. त्याचप्रमाणे, दक्षिण हिंदुस्थानातील प्रमुख बाजारपेठांमध्ये प्रगती मंदावण्याची शक्यता आहे. बंगळूर (६९,०००), हैदराबाद (६३,७००) आणि चेन्नई (३५,६००) सह एकूण १,६८,००० हून अधिक फ्लॅट्सवर परिणाम होऊ शकतो.
बाजार तज्ज्ञांच्या मते, स्थावर मालमत्तेची पुरवठा रचना बाह्य जागतिक धक्क्यांना नेहमीच अत्यंत असुरक्षित असते. त्यामुळे नियोजित वेळापत्रक आणि प्रत्यक्ष ताबा यामध्ये मोठी तफावत निर्माण होते. अनारॉक रिसर्चनुसार, कोरोना काळात २०२० या वर्षात, या सात प्रमुख शहरांमध्ये अंदाजे ४,६६,००० घरे वितरित केली जाणार होती. तथापि, लॉकडाऊन, कामगारांचे स्थलांतर आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे, लक्ष्याच्या केवळ ४६ टक्के, म्हणजेच २,१४,००० घरेच वितरित केली गेली.
सध्याची परिस्थिती कोविड-१९ महामारीच्या काळासारखी गंभीर नसली तरी, वाढत्या इंधन, वाहतूक आणि बांधकाम साहित्याच्या किमती प्रकल्पांवर गंभीर परिणाम करू शकतात. त्यामुळे 5 लाखा घरांची ताबा प्रक्रिया रखडण्याची भीती व्यक्त होत आहे.



























































