बनावट दुधाचे रसायन जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुधात घातक केमिकलची भेसळ करणाऱया टोळीवर पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी सोमवारी पहाटे कारवाई केली आहे. यात 14 कॅन केमिकल व 19 कॅन दूध जप्त करण्यात आले आहे. हे केमिकल फुलचिंचोली येथील एका डेअरीमध्ये घेऊन जात असल्याची माहिती पुढे येत आहे. दुधाची गुणवत्ता व बनावट दूध तयार करण्यासाठी या केमिकलचा वापर करण्यात येत होता. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नीलेश बाळासाहेब भोईटे (वय 30, रा. वृंदावनम सोसायटी, टाकळी), परमेश्वर सिद्धेश्वर काळे (वय 40, रा. काळे मळा, फुलचिंचोली), गणेश हनुमंत गाडेकर (वय 25, रा. गणेश नर्सरीजवळ, टाकळी रोड, पद्मावती, पंढरपूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलीस हवालदार नवनाथ सावंत हे 16 जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत रात्रीची गस्त करीत होते. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास टाटा इंट्रा, अशोक लेलँड अशी दोन संशयित वाहने नवीन वाखरी-गुरसाळे बायपास फ्लायओव्हर पुलाजवळ त्यांना दिसून आली. त्यामधील टाटा इंट्रा टेम्पोमध्ये दूध भरण्याचे रिकामे 19 कॅन व दुसऱया अशोक लेलँड टेम्पोमध्ये निळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे 14 कॅन. या 14 कॅनमध्ये पांढऱया रंगांचे लिक्विड भरलेले दिसून आले. तिथे उपस्थित असणाऱया तिघांची चौकशी केली असता, या कॅनमध्ये दुधामध्ये भेसळ करण्याचे केमिकल असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी दुधाचे रिकामे कॅन आणि प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये असलेले पांढरे लिक्विड याबाबत सखोल चौकशी केली. तेव्हा सदरचे लिक्विड सुमित मेहता (रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती) यांच्याकडून दुधात भेसळ करण्याकरिता आणले असल्याचे सांगितले आहे. याबाबत अन्न व औषधी प्रशासन विभाग यांना कळविण्यात आले आहे. या पथकाने पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे येऊन रसायनाचे नमुने घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.