दूध 15 रुपयांनी महागणार? खासगी दूध उत्पादकांचा भाववाढीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
milk-1
म्हशीच्या दुधात जास्त प्रथिनं असतात. तर गायीच्या दुधात कमी प्रथिनं असतात. म्हणूनच म्हशीचे दुध पचण्यास थोडं जड असतं.

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी लागू केल्याने दुधाच्या विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्लॅस्टिकबंदीमुळे यापुढे प्लॅस्टिक पाऊचऐवजी काचेच्या बाटलीतून ग्राहकांना दूध द्यावे लागेल. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर प्रतिलिटर दुधामागे 10 ते 15 रुपयांचा वाढीव भार पडेल, असे राज्य दूध कल्याणकारी खासगी दूध उत्पादकांच्या संघाने स्पष्ट केले आहे.

प्लॅस्टिकबंदीतून दुधाला वगळावे अशी मागणी दूध उत्पादकांची आहे, मात्र त्यास सरकारने ठाम नकार दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर खासगी दूध उत्पादकांची पुण्यात बैठक झाली. यावेळी सरकारने दुधाला प्लॅस्टिकबंदीतून वगळण्याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास दूध उत्पादक आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.

उत्पादकांनी भाववाढीच्या धमक्या देऊ नयेत!
दूध उत्पादकांनी दुधाचे भाव वाढवण्याच्या धमक्या देऊ नयेत. अशा धमक्यांना सरकार घाबरणार नसल्याचे राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले. खासगी दूध उत्पादक आणि विक्रेत्यांना सरकारने योजना दिली आहे. अर्धा लिटर दुधाचा पाऊच देताना 50 पैसे तर एक लिटरचा पाऊच देताना ग्राहकांकडून एक रुपया डिपॉझिट घेतले पाहिजे. हा निर्णय आपल्या भावी पिढीसाठी आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले. दरम्यान उत्पादक म्हणतात त्याप्रमाणे दुधाची कोणतीही दरवाढ होणार नसून आपण मंगळवारी उत्पादकांची बैठक बोलवल्याचे त्यांनी सांगितले.